ज्या शालेय मुलींची मासिक पाळी सुरु झाली आहे, अशा गरजू मुलींना त्या कालावधीत अडचणींवर मात करून शाळेत उपस्थित राहता यावे, तसेच त्यांचे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत सहकार्य करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेने इयत्ता ९वी आणि १०वीच्या मुलींना शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन्स बसवल्या. परंतु कोविडनंतर शाळा सुरु झाल्या, तरीही या वेंडिंग मशिन्समध्ये सॅनिटरी पॅड्सच नसल्याच्या तक्रारी आता शिक्षकांकडे येवू लागल्या आहेत. त्यामुळे मोठा गाजावाजा करत बसवल्या गेलेल्या या सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन्समध्ये पॅड्स कधी उपलब्ध करून दिले जाणार, असा प्रश्न आता विद्यार्थिनींकडून शिक्षकांना केला जात आहे.
शाळांमध्ये ३८४ मशिन्स विविध शाळांमध्ये बसवण्यात आल्या
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये प्रथम १७२ सॅनिटरी नॅपकीन वेंडिंग मशिन्स बसवण्यात आल्या होत्या. या मशिन्सच्या देखभाल व दुरुस्तीचा कालावधी संपुष्टात आला. त्यानंतर २०१९मध्ये काही वेंडिंग मशिन्स बसवण्यात आल्या. तब्बल ३८४ मशिन्स विविध शाळांमध्ये बसवण्यात आल्या आहेत, परंतु कोविडमध्ये शाळा बंद होत्या, त्यामुळे या वेंडिंग मशिन्स धूळ खात पडल्या होत्या आणि त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत गेले. आता शाळांमधील या वेंडिंग मशिन्समध्ये सॅनिटरी पॅड्सच उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनींना पॅड्स उपलब्ध होत नाही.
(हेही वाचा गोवा तो झांकी है, राजस्थान, छत्तीसगढ़ बाकी है। चित्रा वाघ यांचे ट्विट)
वेंडिंग मशिन्समध्ये सॅनिटरी पॅड्सची कमतरता भासणार नाही
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनीही अशा प्रकारच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. या तक्रारीनंतर प्रशासकीय अधिकारी (शाळा) यांना पत्र पाठवून ज्या ज्या शाळांची मागणी असेल त्याप्रमाणे त्या त्या शाळांना सॅनिटरी नॅपकीन पॅड्स उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार काही शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीन पॅड्स उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही शाळांमधील वेंडिंग मशिन्समध्ये सॅनिटरी पॅड्सची कमतरता भासणार नाही याची काळजी शिक्षण विभाग घेत असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community