एका भामट्याने एकट्या राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचा गैरफायदा घेत त्यांचे मृत्यूपत्र तयार करून स्वतःचे नाव वारस म्हणून लावण्यास भाग पाडले. एवढ्यावर न थांबता या भामट्याने या वृद्ध दाम्पत्याकडून ‘सुसाईड नोट’ लिहून घेत दोघांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना कांदिवली पश्चिम चारकोप येथे घडली. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या भामट्याचा शोध सुरू केला आहे.
( हेही वाचा : महापालिका शाळांमधील वेंडिंग मशिन्समध्ये सॅनिटरी पॅड्सच नाहीत!)
विवेक जयंतीभाई भदानी असे या भामट्याचे नाव आहे. कांदिवली पश्चिम चारकोप या ठिकाणी रसिक शिरोदिया (६९) हे पत्नी मीना (६३) हे दाम्पत्य एकटेच राहत असून रसिक शिरोदिया हे जोगेश्वरी येथे ‘सौराष्ट्र पटेल समाज’ या संस्थेत व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. या संस्थेच्या गेस्ट हाऊस, लग्नमंडपाचे सर्व आर्थिक व्यवहार तसेच त्याचे सर्व बुकिंग रसिक शिरोदिया हे मागील १८ वर्षांपासून बघतात.
मे २०२२ मध्ये विवेक भदानी ही व्यक्ती त्यांच्या गेस्ट हाऊसवर आली आणि त्याने एक खोली बुक केली, विलेपार्ले येथे घराचे दुरुस्तीचे काम सुरू असून ते पूर्ण होईपर्यंत मी इकडेच राहीन असे त्याने रसिक यांना सांगितले. रसिक आणि भदानी यांच्यात हळूहळू ओळख होऊन चांगली मैत्री झाली. भदानी हा रसिक यांच्या घरी जाऊ येऊ लागला होता. गेस्ट हाउसमधील दुसरे व्यवस्थापक जितेंद्र यादवजी राखोलीया यांच्यासोबत रसिक यांचा किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद झाला होता. ही बाब रसिक यांनी भदानीला सांगितली. दोन दिवसांनी जितेंद्रची संस्थेच्या मुख्य कार्यालयात तक्रार केली असून जितेंद्रकडून राजीनामा लिहून घेणार असल्याचे भदानीने रसिक यांना सांगितले.
१४ जून रोजी संस्थेचे विश्वस्त हे गेस्ट हाऊसवर येऊन गेले असून ते जितेंद्रला कामावरून काढणार असल्याचे भदानी याने रसिक हे कामावर आले त्यावेळी त्यांना सांगितले, व त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी रसिक यांना ‘मुंबई पोलीस कांदिवली पोलीस ठाणे’ या पत्यावरून मेल आला व तुमच्याविरुद्ध जितेंद्र राखोलीया याने तक्रार दाखल केली असल्याचे यात म्हटले होते, ही बाब रसिक यांनी भदानी यांना सांगितली. पोलीस ठाण्यात ओळख असल्याचे सांगून प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली त्याने १ लाख रुपये घेतले, त्यानंतर भदानीने कधी पोलिसांच्या नावाखाली तर कधी म्हाडाच्या नावाने इ मेल पाठवून तुमचे घर अनधिकृत असल्याचे सांगत थोडे थोडे करून ३०लाख रुपये उकळले.
गुन्हा दाखल
एवढ्यावर न थांबता भदानी यांनी रसिक आणि त्यांची पत्नी यांना विश्वासात घेऊन त्यांना मृत्युपत्र बनवायला लावले व स्वतःला वारस लावले. तसेच या वृद्ध दाम्पत्याना पोलीस आणि म्हाडाची भीती दाखवून त्यांनी आत्महत्या करावी असे सांगून त्यांना सुसाईट नोट लिहायला भाग पाडले. मात्र या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या रसिक यांनी भाऊ आणि भाच्याला हा प्रकार सांगितला असता तुमची फसवणूक करण्यात आली असून तुमचे बरेवाईट करण्याच्या हेतूने भदानी हा सर्व प्रकार करीत असल्याचे भावाने सांगितले आणि थेट चारकोप पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी विवेक भदानी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community