18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर यशवंत सिन्हा हे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत. राष्ट्रपती पदासाठी होणा-या निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना खासदारांची बैठक घेतली.
या बैठकीत शिवसेना खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. पण याचबाबत आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेनेने यापूर्वी राजकारणापलिकडे जाऊन राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
(हेही वाचाः शिवसेनेचे खासदारही आमदारांच्या वाटेवर? बैठकीला सात खासदारांची दांडी)
काय म्हणाले राऊत?
शिवसेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देण्याची मागणी केली. शिवसेनेने यापूर्वी अनेकदा राजकारणाच्या पलिकडे जाऊन एका व्यक्तीला राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी यांच्याबाबतीत याआधी शिवसेनेने अनुकूल भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुर्मू यांना समर्थन देण्याच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली असून, त्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community