५ जून रोजी एकनाथ शिंदे यांनी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी ही भेट दिल्यामुळे या भेटीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. उद्धव ठाकरे सरकार असताना त्यांनी शिवसेना भवन अगदी हाकेच्या अंतरावर असताना देखील सावरकर स्मारकाकडे पाठ फिरवली होती. इतकंच काय तर त्यांनी गुरुवर्य संभाजी भिडे यांनाही भेटण्यास नकार दिला होता. कारण त्यांना सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या सेक्युलर गटात प्रवेश मिळवायचा होता आणि त्यामुळेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर खालच्या दर्जाची टीका केली होती.
उद्धव ठाकरे सत्य विसरले
कै. बाळासाहेब ठाकरे यांचे या सर्वांशी जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. परंतु संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची तत्वे गुंडाळून टाकली आणि त्यांनी ढोंगी सेक्युलरवादाला जवळ केलं. कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे ५२ वर्षांचे नुकतेच वयात आलेले युवराज राहुल गांधी अतिशय खालच्या दर्जाची टीका सावरकरांवर करत असताना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे आणि आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, असं म्हणणारे उद्धव ठाकरे मात्र गप्प बसले होते. कारण त्यांना सोनिया गांधींची मर्जी राखायची होती. अनंत करमुसे प्रकरण असो, पालघर साधू हत्याकांड असो, अशा सर्व प्रकरणात उद्धव ठाकरेंनी गप्प बसणं पसंत केलं. आता त्यांचेच लोक त्यांच्यावर नाराज झालेले आहेत. एकनाथ शिंदेंनी केलेला उठाव हा या दृष्टीने महत्वाचा ठरतो. आता त्यांनी सावरकर स्मारकाला भेट देऊन आपलं सरकार कोणत्या दिशेने कार्य करणार आहे हे स्पष्ट केलेलं आहे. शिवसेना हिंदुत्व असा शब्द उच्चारते, तो हिंदुत्व हा शब्द वीर सावरकरांनी अजरामर केलेला आहे. हिंदुत्व हा ग्रंथ लिहून त्यांनी भारतीयांना मार्गदर्शन केलेलं आहे. सावरकरांच्या १०० वर्षे आधी आणि आजतागायत त्यांच्याइतका मोठा हिंदुत्ववादी नेता झालेला नाही, हे सत्य उद्धव ठाकरे विसरले.
(हेही वाचा शिवसेनेचे ४१ आमदार फडणवीसांना ‘भेटले’, आता ११ खासदार शहांना ‘भेटले’)
तर शिवसैनिक लोकोपयोगी कामे करतील
एकनाथ शिंदेंनी सावरकर स्मारकाला भेट देऊन हे अधोरेखित केले आहे की, आमचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि आम्ही सावरकरांचा अपमान सहन करणार नाही. तसेच सावरकरांनी शिकवलेल्या मार्गावरुन आम्ही चालणार आहोत. शरद पवारांच्या मगरमिठीत जाणारी शिवसेना शिंदेंनी वाचवली आहे आणि पुन्हा मूळ रुपात आणलेली आहे यात वाद नाही. आता त्यांच्या नेतृत्वात शिवसैनिक सामान्य लोकांना मारहाण करण्याऐवजी लोकोपयोगी कामे करतील.
Join Our WhatsApp Community