बँकांनी नियमांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकांना दंड आकारत असते. आता रिझर्व्ह बँकेने ‘द नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँके’सह तीन सहकारी बँकांना Regulatory Compliance त्रुटींबद्दल दंड ठोठावल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – शाळेत कुर्ता परिधान केला म्हणून पगार रोखला, मुख्याध्यापकाला जिल्हाधिकाऱ्याकडून दमदाटी)
फ्रॉडची सूचना आणि निगराणी यासंदर्भात नाबार्डद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने मुंबईस्थित महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेला 37.50 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. तर गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने खासगी कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली होती. रेग्युलेटरी नियमांच्या पालनात ढिलाई केल्याने रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेला 1 कोटी 05 लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. तर यासह इंडसइंड बँकेविरोधातही कारवाई करण्यात आली होती.
मुंबईतील या बँकेला 37.50 लाख दंड
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबईस्थित ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँके’ने फसवणूक अहवाल आणि देखरेख संदर्भात जारी केलेल्या राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) निर्देशांचे पालन न केल्याबद्दल बँकेला 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
…म्हणून ठोठावला 50 लाखांचा दंड
तर रिझर्व्ह बँकेने असेही सांगितले की ‘द नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँके’ला इतर बँकांमधील ठेवींचे नियोजन आणि ठेव रकमेवरील व्याजाच्या बाबतीत आरबीआयच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बिहारमधील बेतिया येथे असलेल्या ‘नॅशनल सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’लाही 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
या 2 मोठ्या बँकांना प्रत्येकी 1 कोटींचा दंड
रेग्युलेटरी नियमांमधील त्रुटींमुळे हा दंड ठोठावण्यात आला असल्याचे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले. याआधी RBI ने कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँकेला प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. ‘नो युवर कस्टमर’ (केवायसी) नियमांचे पालन न केल्यामुळे इंडसइंड बँकेला हा दंड ठोठावण्यात आला.
Join Our WhatsApp Community