केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडून दिल्ली ते मुंबई दरम्यान इलेक्ट्रिक हायवे तयार करण्याची योजना सुरु करण्याचा विचार होत असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. गुडगांव येथील हायड्रोलिक ट्रेलर ओनर्स असोसिएशनच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन
परिवहन विभागांत होणारा भ्रष्टाचार टाळण्यासाठी परिवहन विभागातील सर्वच सेवा डिजिटल करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, असे नितीन गडकरी यांना सांगितले आहे. पुढील एक ते दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची किंमत पेट्रोल वाहनाच्या बरोबरीने होईल, असे सांगून कार आणि दुचाकीस्वारांना गडकरी यांनी आनंदाची बातमी दिली होती. वास्तविक, वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. त्यामुळेच या वाहनांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
असा असणार इलेक्ट्रिक हायवे
या इलेक्ट्रिक हायवेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक हायवेवरुन धावणा-या वाहनांना वीजपुरवठा केला जाणार आहे. रस्त्याच्या वर बसवलेल्या विद्युतवाहक तारांद्वारे हा वीजपुरवठा वाहनांना केला जाणार आहे. हा हायवे एका विशिष्ट पद्धतीने तयार केला जातो. असे हायवे हे पर्यावरणपूरक असतात त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे सोपे होते. या हायवेवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक विशेष लेन तयार करण्यात येईल. या विशेष लेनवरुन इलेक्ट्रिक गाड्या आणि बस चालवण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. 120 किमी. प्रति तास या वेगाने या गाड्या धावतील.
Join Our WhatsApp Community