शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांची उद्धव ठाकरे यांनी सोमवारी हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केली. त्यामुळे संतोष बांगर यांनी हिंगोली जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर बांगर हे मंगळवारी मुंबईत दाखल झाले असून त्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी हिंगोलीचे जिल्हाप्रमुख हे संतोष बांगरच असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा आणखी एक निकाल बदलत उद्धव ठाकरे यांना मोठा दणका दिला आहे.
बांगरच शिवसेना जिल्हाप्रमुख
जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर यांनी मंगळवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन केले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना संतोष बांगरच हिंगोलीचे जिल्हाप्रमुख असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले आहे. संतोष बांगर हे कार्यतत्पर आमदार आहेत, कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखामध्ये बांगर हे धावून जात असतात. त्यांची आपल्या मतदारसंघात असलेली पत आणि ताकद वेगळी सांगण्याची गरज नाही. एक सर्वसामान्य कार्यकर्ता हिंगोलीतील जनतेने निवडून दिला आहे. त्यामुळे संतोष बांगर हेच खरे हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
(हेही वाचाः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय)
तुम्ही सगळे मुख्यमंत्री
बाळासाहेबांच्या विचारांनी केलेल्या या उठावाची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे. त्यामुळेच हे लोकांच्या मनातलं, सर्वसामांन्यांचं,कष्टक-यांचं आणि वारक-यांचं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेचं समर्थन महाराष्ट्रातील जनतेनं केलं आहे. एकनाथ शिंदे हा एकटा मुख्यमंत्री नाही तर राज्यातील सगळी जनता ही मुख्यमंत्री असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community