पुण्यासह उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. याचा वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, महाबळेश्वर, मुंबई व नाशिक या भागातून येणाऱ्या एसटी गाड्यांना सध्या ३० ते ४० मिनिटांचा उशीर होत आहे. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पुण्याच्या ‘पीएमपी’ बसचे सोमवारचे वेळापत्रक कोलमडले. ‘पीएमपी’च्या १५० फेऱ्या रद्द झाल्या. पुण्यात आठवड्यापासून पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांवर साचणाऱ्या पाण्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे.
याचा सर्वाधिक फटका पीएमपीला आणि बाहेरून येणाऱ्या एसटी बसेसला बसला. तसेच पुण्याला येणाऱ्या तीन रेल्वे गाड्यांना सुद्धा उशीर झाला. यात काझीपेठ एक्सप्रेसला साडेसहा तास, हावडा-पुणे एक्स्प्रेससह भुसावळ-पुणे एक्स्प्रेसला पुणे स्थानकावर येण्यास ३ तास १० मिनिटांचा उशीर झाला. रस्ते वाहतुकीसह हवाई वाहतुकीवर सुद्धा पावसाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या विमानास २५ मिनिटांचा उशीर, तर पुण्याहून चेन्नईला जाणाऱ्या विमानास ३० मिनिटांचा उशीर झाला.
पावसाचा परिणाम
- पुण्यात वाहतूक कोंडीमुळे पीएमपी बसचे मोठे नुकसान १५० फेऱ्या रद्द
- विमानांना अर्धा तास उशीर
- खासगी टॅक्सी आणि रिक्षांच्या मागणीत वाढ
- लोकलच्या फेऱ्या आणि मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक सुरळीत