18 जुलै रोजी होणा-या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना कोणाला पाठिंबा देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी याबाबतीत शिवसेनेच्या संसदेतील खासदारांची बैठक घेऊन याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुर्मू यांना पाठिंबा देणार
गेल्या काही दिवसांपासून मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा यासाठी शिवसेनेतील नेत्यांच्या, जिल्हाप्रमुखांच्या बैठका मी घेत आहेत. गेल्या चार पाच दिवसांपासून मला माझ्या शिवसैनिकांनी, आदिवासी विभागात काम करणा-या जनतेने विनंती केली आहे. एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे, विधान परिषदेवर शिवसेनेने निवडून पाठवलेले आमशा पाडवी यांनी देखील माझी भेट घेऊन मला विनंती केली. त्यामुळे मी हा निर्णय घेत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
विरोध करायला हवा होता पण…
सध्या जे काही राजकारण सुरू आहे ते पाहता मी मुर्मू यांना पाठिंबा देण्याऐवजी विरोध करायला हवा होता, पण शिवसेनेने कधीच राष्ट्रपती पदासाठी कोत्या मनाने विचार केला नाही. ज्यावेळी प्रतिभाताई पाटील यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी आलं तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारणाचा विचार न करता देशाचा विचार करत त्यांना पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांच्या बाबतही तोच निर्णय शिवसेनेने घेतला. त्याच परंपरेप्रमाणे हा निर्णय मी घेत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
माझ्यावर कुठलाही दबाव नाही
खासदारांच्या बैठकीत कोणीही कोणताही दबाव माझ्यावर आणलेला नाही. राष्ट्रपती पदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाला नाही, हा निर्णय खासदारांनी माझ्यावर सोपवला होता. त्यानुसार मी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझ्यावर दबाव असल्याचा बातम्या या चुकीच्या असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community