महाराष्ट्राला राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार

150

खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्राला आज केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय खनिज पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच राज्याला २ कोटी ७ लाख ३४ हजार आणि ३७५ रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात आली. केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाच्यावतीने येथील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित ६व्या खाण व खनिज संमेलनात हे पुरस्कार व प्रोत्साहन राशी वितरीत करण्यात आली. यावेळी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विभागाचे सचिव आलोक टंडन उपस्थित होते.

राज्याला १ कोटीचा राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार

या समारंभात वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ करिता एकूण तीन श्रेणींमध्ये प्रत्येकी ३ राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार देण्यात आले. खनिज श्रेणीत महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. १ कोटी रुपये रोख, चषक आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वर्ष २०२०-२०२१ दरम्यान खनिज ब्लॉकच्या यशस्वी लिलावासाठी देशातील १० राज्यांना या समारंभात केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज प्रोत्साहन राशी प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रालाही या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी २ कोटी ७ लाख ३४ हजार आणि ३७५ रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात आली. राज्याच्या उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांनी ही रक्कम स्वीकारली.

(हेही वाचा लढाई लोकशाहीच्या रक्षणाची, आदिवासी, स्त्री-पुरुषाची नाही! राष्ट्रपती निवडणुकीवर शिवसेनेबाबत काय म्हणाले थोरात?)

महाराष्ट्राला ५ खनिज ब्लॉक हस्तांतरित

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने प्राथमिक खनिज शोध लावलेल्या महाराष्ट्रातील ५ ब्लॉकचेही यावेळी केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते राज्याला हस्तांतरण करण्यात आले. भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्हयांसाठी हे एकूण ५ ब्लॉक हस्तांतरित करण्यात आले. या हस्तांरणानंतर राज्य शासनाला संबंधित ब्लॉकचा लिलाव करून अधिक खनिज सर्वेक्षण करता येऊ शकेल.

राज्यातील ६ पंचतारांकित खाणींनाही पुरस्कार

या समारंभात केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते देशातील ४० खाणींना उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील ६ खाणींचा यात समावेश आहे. यात भंडारा जिल्हयातील चिकला मँगनीज खाण, गोंदिया जिल्हयातील धोबीतोला लोखंड खनिज खाण, नागपूर जिल्हयातील गुमगांव आणि कांद्री मँगनीज या दोन खाणी, चंद्रपूर जिल्हयातील माणिकगड आणि नावकरी या दोन चुनखडी खाणींना गौरविण्यात आले. या खाणींच्या व्यवस्थापनविषयक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.