शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएने आयोजित केलेल्या बैठकीचे शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत. एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.
शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना, शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले होते. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, नारायण राणेंनी कोणत्या पक्षात जावे हे सांगितले नव्हते, असेही पवारांनी सांगितल्याचा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ यांना स्वत: शरद पवारांनी बाहेर नेले. राज ठाकरे यांच्या पाठिशीही शरद पवारांचे आशिर्वाद होते. कारण, शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत, असे सूचक वक्तव्यही दीपक केसरकर यांनी केले.
शिवसैनिकांनी विचार करावा
अडीच वर्षांत राष्ट्रवादीला टाॅनिक मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्वबळावर सत्ता आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या नेत्यांकडून तसे जाहीरपणे सूतोवाचही केले जात आहेत. त्यामुळे याचा विचार शिवसैनिकांनी करावा, असे आवाहन केसरकरांनी केला आहे.
( हेही वाचा: बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच राज्याचा मुख्यमंत्री झालो – एकनाथ शिंदे )
शिवसैनिक कधीही पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही
केसरकर पुढे म्हणाले की, मातोश्री कधीही सिल्व्हर ओकच्या दारात गेली नाही. बाळासाहेबांना काॅंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणे कधीही मान्य नव्हते. माझ्या पक्षात मी शेवटचा माणूस राहिलो तरीही मी काॅंग्रेससोबत जाणार नाही, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यामुळे शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community