गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. संततधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. रस्त्यांना पडलेले खड्डे त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठी समस्या निर्माण झालेली आहे. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यांमध्ये पाणी जमा झाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. अशी स्थिती असताना त्यातच आता हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Coal Scam Case: ED ची मोठी कारवाई, आरोपींची 25 कोटींची संपत्ती जप्त)
पुण्यात शाळांना उद्या सुट्टी
पुणे शहर आणि परिसरात या चार पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व हवामान विभागाने गुरुवारी (ता. १४) अतिवृष्टीचा इशारा दिल्याने उद्या (गुरूवारी) पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
रायगडमध्येही शाळा बंद
रायगड जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने रायगडमधील शाळांना बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
नाशिकमध्येही शाळांना सुट्टी
गोदावरीसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना पूर आला असून, पुढील दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी पहिली ते बारावीच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांना मंगळवारी सुट्टी देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी दिली.
Join Our WhatsApp Community