पोलीस चौकीत घरफोडी, अज्ञातावर गुन्हा दाखल

134

चोरट्याने पोलिसांनाच चोरीचा हिसका दाखवल्याची घटना मुंबईतील एका पोलीस चौकीत घडली. अज्ञात चोरट्याने पोलीस चौकीत घुसून पोलिसांच्या खिशातील सोन्याची साखळी चोरल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिथे पोलीस सुरक्षित नाही, तिथे नागरिक कसे सुरक्षित असतील असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.

( हेही वाचा : ४८ तासांमध्ये मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे पूर्ववत करा; महापालिकेकडे भाजपने केली मागणी)

खार पोलीस ठाण्यात तैनात असलेले कांतीलाल गर्जे हे पोलीस अंमलदार असून त्यांची ड्युटी खार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कबुतरखाना पोलीस चौकीत कार्यरत आहेत. ५ जुलै रोजी कांतीलाल गर्जे हे आपली रात्रपाळी संपवून चौकीत पोलीस गणवेश बदलण्यासाठी चेंजीग खोलीत गेले व त्यांनी गणवेश बदलला आणि ते गणवेश चौकीत टांगून घरी निघून गेले.

घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या गळ्यात सोनसाखळी नसून ते गणवेश बदलत असताना गणवेशात साखळी विसरले. दुसऱ्या दिवशी गर्जे कर्तव्यावर आले व त्यांनी सर्वात प्रथम गणवेशाचे खिसे तपासले असता त्यांना त्यांची सोनसाखळी मिळाली नाही. त्यांनी इतर अमलदारांकडे चौकशी केली मात्र त्यांना काहीच माहित नसल्याचे सांगितले. अखेर गर्जे यांनी वरिष्ट पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली व कोणी सोनसाखळी घेतली असेल तर ५ दिवसात पोलीस ठाण्यात जमा करण्याचा पोलीस ठाणे अंतर्गत आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी काढला.

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी

परंतु पाच दिवस उलटले तरी सोनसाखळी मिळाली नाही त्यामुळे अखेर गर्जे यांनी खार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीची तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकीत प्रवेश करून पोलिसांच्या गणवेशातून सोनसाखळी चोरी करण्याची धाडस करणाऱ्या चोराच्या शोधासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.