एकनाथ शिंदे आणि भाजपने राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच बदलले आहे. भाजपमधील नेत्यांकडून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका होत असल्याने शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाजप नेत्यांना सुनावले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र भाजप आमदार नितेश राणे आणि भाजप नेते निलेश राणे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका होत असतानाच दीपक केसरकर यांनी राणे पुत्रांवर जोरदार हल्ला चढवला. त्याला आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे केसरकर-राणे यांच्यातील जुना वाद समोर आला आहे. राणेंची दोन्ही मुलं लहान असून त्यांना समज देण्याची गरज आहे, असे विधान दीपक केसरकर यांनी केले होते. त्यावर निलेश राणे यांनी टीका केली आहे.
(हेही वाचाः ‘आमदार-खासदारांना पेन्शन द्या…’, असं संविधानात सांगितलंच नाही, तरीही का मिळतंय?)
इज्जत मिळते ती घ्यायला शिका
केसरकर आपण सध्या युतीत आहोत, हे विसरू नका. ही युती टिकवण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असाल पण आमचे नाही. 25 दिवसांपूर्वी आपण किती लहान होतात हे विसरू नका. त्यामुळे इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकीपेक्षा जास्त बोलू नका, अशा शब्दांत निलेश राणे यांनी केसरकरांना प्रत्युत्तर दिले आहे.
दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 13, 2022
तर जशास तसे उत्तर देऊ
तुमची अवस्था आम्ही मतदारसंघात काय केली आहे हे माहीत आहे. राणेंच्या याच दोन मुलांनी तुमची नगरपालिका तुमच्याकडून घेतली आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीही आम्ही तुमच्याकडून घेतली आहे. त्यामुळे तुम्ही उड्या मारू नका. तुम्हाला कुबड्या मिळाल्या त्यावरुन चाला, तुम्हाला राजकीय जीवनदान मिळाले आहे हे विसरू नका. त्यामुळे आम्हाला सांगू नका नाहीतर आम्ही सुद्धा जशास तसे उत्तर देऊ, अशा शब्दांत निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांना इशारा दिला आहे.
(हेही वाचाः पवारांनी मुंबई मनपा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले! म्हणाले “कुणी सोबत…”)
काय म्हणाले होते केसरकर?
उद्धव ठाकरे यांच्याविरोधात स्वतः नारायण राणे यांनी कुठलेही अपशब्द काढलेले नाहीत. त्यांची दोन्ही मुलं लहान आहेत. ते काय ट्वीट करतात ते मी बघत नाही, लहान-लहान मुलं ट्वीट करत असतात त्याची कोणी दखल घेत नाही. पण जर हे घडलं असेल तर मी नक्कीच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगेन, ते त्यांना समजावण्याचे काम फडणवीस नक्कीच करतील, अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी राणे पुत्रांवर टीका केली आहे.
Join Our WhatsApp Community