मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेला स्थानिक पातळीवर देखील मोठा धक्का बसत असून, शिवसेनेचे नगरसेवक, जिल्ह्यातील पदाधिकारी शिंदे गटात सहभागी होत आहेत. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचा देखील शिंदे गटात प्रवेश झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती लागली असल्याचे बोलले जात आहे.
भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवा सेना पदाधिकारी विकास गोगावले यांनी बुधवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मिळाल्याचे बोलले जात आहे. विकास गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मंगळवारी शिवसेनेच्या दहिसर येथील माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट शिंदे गटात प्रवेश केला होता.
उल्हासनगरचे नगरसेवक शिंदे गटात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यानंतर शिवसेनेतील अनेक जिल्ह्यांतील पदाधिकारी, नगरसेवक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होताना दिसत आहेत. ठाणे, नवी मुंबईनंतर आता उल्हासनगर महापालिकेतील 15 हून अधिक नगरसेवकांनी शिंदे गटाला आपले समर्थन दिले आहे. तसेच दिंडोरी आणि नाशिक इथल्या शिवसेनेचे नगरसेवक आमच्या पाठिशी असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.