गेल्या चार दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने चांगलाच कहर केला आहे. मंगळवारी रात्रीपासून गडचिरोलीत अधिक पाऊस वाढला. यावेळी काही तासातच ३२५ मिमी इतका विक्रमी पाऊस पडल्याने नागेपल्लीला चारही बाजूने पुराचा वेढा पडला. गडचिरोलीतील स्थिती आणि पुराची परिस्थिती बघता शनिवारी १६ जुलैपर्यंत शाळा महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटल्याची माहिती मिळतेय.
(हेही वाचा – आता OLA, UBER कॅब चालकांची मनमानी होणार बंद, कारण…)
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात १२ पैकी ८ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. भामरागड येथे २४ तासात १६० मिमी पावसाची नोंद झाली तर या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील १० मार्ग सध्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणातून ८ हजारांपेक्षा अधित क्यूसेक जलविसर्ग होत असल्याने वैनगंगा नदीकाठच्या गावांना इशारा दिला आहे. आगामी काही दिवस मुसळधार पावसाचे असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ दौरा करत अतिवृष्टी झालेल्या भागांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील मेडीगट्टा महा बंधाऱ्यातून १५ लाख ७७ हजार क्युसेक एवढा विसर्ग सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच भामरागड येथे असलेल्या पर्लकोटा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असल्याने भामरागड तालुका आणि तालुक्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटल्याची माहिती मिळतेय.