शिंदे-फडणवीस सरकारचं मोठं गिफ्ट, पेट्रोल-डिझेलच्या दरांत मोठी कपात

173

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या हिताचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात करण्यात आली असून, या निर्णयामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कमी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने काही लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचं काम आमच्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळेच आपण पेट्रोल आणि डिझेलवरील राज्य सरकारचे कर कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

पेट्रोल-डिझेलच्या करात कपात

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारांना देखील हे कर कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकारने निर्णय घेतला असून पेट्रोलवरील कर 5 रुपयांनी तर डिझेलवरील कर 3 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. गुरुवारी रात्री 12 पासून हा निर्णय संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात होऊन सर्वसामांन्यांना मोठा दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

petrol

थेट निवडणुकांचा निर्णय

यासोबतच राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक ही थेट पद्धतीने घेण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेण्यात याणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.