कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक ‘या’ वेळेत राहणार बंद

167

गेल्या कित्येक दिवसांपासून परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली होती. याबाबत प्रशासनाने आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर सुरू तर रात्रभर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जारी केले आहेत.

( हेही वाचा : SBI बॅंकेच्या ग्राहकांना आता घरबसल्या मिळणार कर्ज! जाणून घ्या कोणाला कसा व किती होणार लाभ )

अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी नियमावली

चौपदरीकरणासाठी ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने चिपळूणजवळील परशुराम घाट धोकादायक बनला आहे. तेथे दरडी कोसळण्याचा धोका असल्याने घाटातील वाहतूक बंद ठेवावी लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर पेण आणि रत्नागिरीतील राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस आणि परिवहन विभागाने घाटाची पाहणी केली. घाटातील वाहतूक सुरक्षित करण्याबाबत आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली. सुरक्षाविषयक विविध कार्यालयांच्या सूचनेनुसार १४ जुलैपासून पुढील आदेश मिळेपर्यंत दररोज सकाळी ६ ते ते सायंकाळी ७ या वेळेत अवजड वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. या वाहनांची वाहतूक सायंकाळी ७ पासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक सुरू असताना दोन अवजड वाहनांमध्ये किमान ५० ते १०० मीटर इतके अंतर असावे. वाहनांचा वेग ताशी २० ते ३० किमी असावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेसाठी घाटात २४ तास गस्त आणि बचावकार्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पर्यायी मार्ग

  • घाटातील वाहतूक कोणत्या वेळी खुली किंवा बंद राहणार आहे, याबाबत घाटाच्या सुरुवातीस आणि घाटाच्या शेवटी तशा सूचना ठळकपणे लावण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच त्याबाबत पनवेल, सिंधुदुर्ग, गोवा आणि व कोल्हापूर येथेही व्यापक प्रसिद्धी देण्याची सूचना करण्यात आली आहे. परशुरास घाटातील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने मुंबईहून येणारी जास्तीत जास्त वाहने, पनवेलहून मुंबई-पुणे महामार्गावरून तसेच गोव्यावरून येणारी वाहने पाली (जि. रत्नागिरी) येथून रत्नागिरी-कोल्हापूर-पुणे या मार्गे वळविण्यात येतील.
  • बंदीच्या कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी-आंबडस- चिपळूण या पर्यायी मार्गाने वळवली जाईल.
  • चिपळूणकडून खेडकडे येणाऱ्या हलक्या वाहनांसाठी कळंबस्ते – आंबडस – शेल्डी – आवाशी, तर चिपळूणकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी पीरलोटे – चिरणी – आंबडस फाटा – कळंबस्ते फाटा या मार्गाने एकेरी वाहतूक वळवावी, असे प्रशासनाने सूचित केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.