“तुला ठार मारण्यासाठी अंडरवर्ल्डकडून १० लाखांची सुपारी मिळाली आहे. तू २० लाख रुपये दिलेस तर तुझा जीव वाचेल” अशी धमकी एका डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या क्रिएटिव्ह डायरेक्टरला सोशल मीडिया आणि कॉलवरून देण्यात आली आहे. या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात खंडणी आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव डब्बू भाई असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ३३ वर्षीय डिजिटल मार्केटिंग कंपनीचे क्रिएटिव्ह डायरेक्टर अंधेरी पश्चिम येथील विरा देसाई रोड या ठिकाणी राहतात. मागील काही दिवसांपासून त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘इमशाद पाशा’ या अकाउंटवरून धमक्या देण्यात येत आहेत. तसेच तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअॅप कॉल करून अज्ञात व्यक्तीने स्वतःचे नाव डब्बू भाई असे सांगून, शिवीगाळ केली. तसेच, ‘तुला ठार मारण्यासाठी भाईकडून १० लाखांची सुपारी देण्यात आली आहे, जर तु मला दुप्पट रक्कम दिलीस, तरच तुझा जीव वाचेल,अशी धमकी दिल्याची तक्रार क्रिएटिव्ह डायरेक्टर याने आंबोली पोलीस ठाण्यात दिली आहे. आंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध खंडणी, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आंबोली पोलीस ठाणे आणि खंडणी विरोधी पथक या गुन्ह्यांचा तपास करत आहे.
( हेही वाचा: देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन; छोटा शकीलचा निकटवर्तीय अटकेत )
Join Our WhatsApp Community