कोकण रेल्वे मार्गावरील अंजनी ते चिपळूण दरम्यान ट्रॅकवर मातीचा भराव आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकाजवळ अडकून पडली होती. पुढील सूचना मिळेपर्यंत खेड रेल्वे स्थानकात तिकीटांची विक्री कोकण रेल्वेकडून थांबविण्यात आली होती. मात्र अंजनी चिपळूण दरम्यान ठप्प झालेली कोकण रेल्वे सेवा दोन तासातच पूर्ववत झाली आहे. ही सेवा पूर्ववत होताच मांडवी एक्सप्रेस चिपळूणकडे रवाना झाली आहे.
(हेही वाचा – राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, शुक्रवारपासून प्रमुख शहरांत असे असतील नवे दर)
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक गुरूवारी साडेतीन ते चार वाजेदरम्यान साधारण दीड तासापासून विस्कळीत झाली होती. यामुळे मुंबईच्या दिशेकडून येणारी मांडवी एक्सप्रेस खेड रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली होती. या मार्गावरील इतर गाड्यादेखील विविध स्थानकांवर थांबविण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाकडून असे सांगितले जात आहे की, कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी ट्रॅकवरील हा मातीचा भराव हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. यानंतर अवघ्या दोन तासात कोकण रेल्वेची सेवा पूर्ववत करण्यात आली.
कोकणात गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सध्या मात्र पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी कोकण रेल्वे ट्रॅकवर मातीचा भराव कोसळल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नसून सर्वजण सुरक्षित आहे. कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे खेड स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याची माहिती मिळतेय.