देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेले मुंबई शहर अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहे. १५ जुलै १९२६ रोजी देशात पहिल्यांदा मुंबईमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी बस धावली. १९२६ पासून सुरू झालेला हा बेस्ट प्रवास आजतागायत अविरत सुरू आहे. १९४७ मध्ये बेस्टला महापालिकेअंतर्गत आणले गेले. १९२६ ते २०२२ या कालावधीमध्ये ट्राम, साधी बस, दुमजली बस, वातानुकूलित बस, इलेक्ट्रिक बस असे बसचे रुप कालानुरूप बदलले आहे. आता दुमजली इलेक्ट्रिक वातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात ७ ऑगस्ट २०२२ रोजी दाखल होणार आहे. मुंबईत धावलेल्या पहिल्या बसला १५ जुलै २०२२ रोजी ९६ वर्ष पूर्ण झाली आहेत.
( हेही वाचा : SBI बॅंकेच्या ग्राहकांना आता घरबसल्या मिळणार कर्ज! जाणून घ्या कोणाला कसा व किती होणार लाभ )
९६ वर्षांचा प्रवास
१५ जुलै १९२६ रोजी अफगाण चर्च, कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर सकाळी ६.३० पासून ते रात्री ११.२० पर्यंत दर १५ ते २० मिनिटांच्या अंतराने ही बससेवा सुरू झाली. या बससेवेचे वेळापत्रक व माहिती आदल्या दिवशी विविध दैनिकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. यानंतर प्रवाशांची मागणी आणि उपयुक्तता लक्षात घेऊन बसताफा वाढवण्यात आला. मुंबई आणि देशातील पहिली मर्यादित बससेवा १९४० मध्ये कुलाबा ते माहिमदरम्यान चालवण्यात आली होती. त्यावेळी वर्षभरात जवळपास, ६ लाख लोकांनी या बससेवेचा लाभ घेतला, आता बससेवेची प्रवासीसंख्या प्रतिमहिना ३१ लाखांवर गेली आहे.
बेस्ट महानगरपालिकेच्या अखत्यारीत
१९२६ पासून बससेवा देणारी बेस्ट १९४७ मध्ये बेस्ट महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली. यानंतर याचे नाव बदलून बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रान्सपोर्ट अर्थात बेस्ट असे करण्यात आले. ११९५ मध्ये बॉम्बेचे नाव मुंबई करण्यात आले त्यामुळे या सेवेचे नाव बदलून बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक असे ठेवण्यात आले. तरीही आजही बससेवा बेस्ट म्हणून ओळखली जाते. बेस्ट ही मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अंतर्गत आहे.
बेस्ट बसपूर्वी ट्रामसेवा
मुंबईची लाईफलाईन असलेल्या बेस्टची सुरूवात एका रात्रीत झाली नसून, १८६५ मध्ये मुंबईत वाहतूक व्यवस्था करण्याचे प्रस्ताव मागवण्यात आले. तेव्हा एका अमेरिकन कंपनीने घोड्याच्या साहाय्याने ओढल्या जाणाऱ्या ट्राम सेवेच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. १८७३ नंतर बॉम्बे ट्रॉमवे कंपनी लिमिटेडने मुंबईत घोड्याच्या साहाय्याने ओढल्या जाणाऱ्या ट्राम सेवा देत होत्या. मुंबईत ९ मे १८७४ रोजी पहिल्यांदा घोड्यांच्या साहाय्याने चालवली जाणारी ट्राम धावली. कुलाबा ते बेडहोन मार्गे क्रॉफर्ड मार्केट, बोरी बंदर ते पायधुनी या मार्गावर ही ट्राम धावली. यानंतर १९२६ ला बेस्टची पहिली बस धावली या बेस्टला १९४७ ला महापालिकेच्या अखत्यारीत आणले गेले. १९९५ पर्यंत हीच सेवा सुरू होती. यानंतर मात्र बेस्टमध्ये अनेक सकारात्मक बदल होत आता बेस्ट मुंबईकरांची लाईफलाईन आहे.
Join Our WhatsApp Community