अमरावती जिल्ह्यातील सिपना, तापी नदीला आलेल्या पुरामुळे धारणी तालुक्यातील २० गावांचा दुपारी १ वाजेपासून सुमारे तीन तास मुख्यालयाशी संपर्क तुटला. त्यानंतर सुरळीत झाला. उतावली येथील पुलावरून पाच फूट पाणी वाहत होते. मोर्शी तालुक्यात मायवाडीनजीक माडू नदीत एक इसम वाहून गेल्याची माहिती आहे. चिखलदऱ्यातही पावसाचा जोर कायम होता. अपर वर्धा धरणाची तीन दारे सायंकाळी सातच्या सुमारास उघडण्यात आली.
(हेही वाचा – राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त, शुक्रवारपासून प्रमुख शहरांत असे असतील नवे दर)
जवळपास २० गावांचा संपर्क तुटला
पूर्णा प्रकल्पाची पाच दारे गुरूवारी सकाळी ११ वाजेपासून, तर सपन प्रकल्पाची दोन दारे सायंकाळी उघडण्यात आली होती. अमरावती शहरातही दिवसभर पावसाने जोरदार बॅटिंग केली. सिपना नदीला बुधवारी दुपारी पूर आला होता. या पुरामुळे दिया गावाजवळून वाहणाऱ्या नदीवरील पुलावरून पाच फूट पाणी वाहत होते. यामुळे जवळपास २० गावांचा संपर्क धारणी मुख्यालयाशी ४ वाजेपर्यंत तुटला होता. यामध्ये उकुपाटी, निरगुडी, केकदा, चेथर, चटवाबोड, काटकुंभ, बुलुमगव्हाण, भोंडीलावा, वैरागड, कुटांगा, रंगुबेली, खामदा, कोपमार, कोबडाढाणा, हरदा आदी गावांचा समावेश आहे.
पाणी शेतात शिरल्याने खरीपातील पिकांना धोका
उतावली येथे सिपना नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे दुपारी जवळपास तीन तास वाहतूक खोळंबली असून, हरदोली, पोहरा, चाकर्दा, गोबरकहू, कारादा, पाटिया, आठनादा, तांगडा या गावांचा धारणी मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. पावसाचे पाणी शेतात शिरल्यामुळे खरीप हंगामातील धान, ज्वारी, तूर, कापूस, मका आदी पिकांना धोका निर्माण झाला आहे.
Join Our WhatsApp Community