सर्वत्र पावसाचा हाहाःकार सुरू असल्याने पालघर जिह्यातील कोयना पुनवर्सन उचाट गावाला जोडला जाणारा मुख्य रस्त्यावरील पूल पावसाच्या पाण्यामुळे अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून वाहनांनी ये-जा करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. भिवंडी – वाडा रोड वरून कुडूस मार्गे उचाट या गावी जाण्याकरिता एकच मार्ग आहे. या मार्गावरील उचाट गावाच्या जवळच रस्त्यावर कित्येक वर्षे जुना असा पूल असून या पुलाच्या डागडुजीकडे जिल्हापरिषदेच्या वतीने दुर्लक्ष केल्याने पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
तो पूल जीर्ण झाल्याने अत्यंत धोकादायक
कोयना धरणामुळे इ.स.१९६२ साली उचाट गावचे पुनर्वसन झाले आहे, तर इ.स. १९७५ साली गावाच्या मुख्य रस्त्यावर बांधकाम विभागाच्या वतीने पूल तयार करण्यात आला. परंतु तो पूल आता जीर्ण झाला असल्याने अत्यंत धोकादायक झाल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता या ठिकाणी झाली आहे. पुलाचे बांधकाम कोसळले तर गावातील नागरिकांचा संपर्कच तुटेल आणि ये-जा करण्याचा मार्गाच बंद होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हापरिषदेच्या वतीने गावाच्या मुख्य रस्त्यावर पूल बांधण्यात आला होता. पण मागील कित्येक वर्षे या पुलाची पाहणी देखील शासनाच्या करण्यात आली नाही, यामुळे आता हा पूल जोरदार पावसामुळे धोकादायक बनला असून तात्काळ याची डागडुजी किंवा पूल नवीन बांधणे आवश्यक आहे.
उचाट हा गावाचा मुख्य रस्ता असून या गावातून बरीच गावे जोडली गेली आहे, तरी शाळेत जाणारी मुले, नोकरी साठी जाणारी माणसे यांचे मोठे नुकसान होणार आहे. यामुळे प्रशासनाला विनंती आहे, लवकरात लवकर, तत्काळ पुलाची
डागडुजी व नवीन पुल बांधकाम करण्याचे आदेश द्यावे. – आशिष मोरे ग्रामस्थ, उचाट गाव
हा पूल धोकादायक बनला असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी जिल्हापरिषदेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून सांगितल्या नंतर या पुलाची अधिकाऱ्यांनी गुरुवारी घाईघाईने पाहणी केली. या धोकादायक जीर्ण पुलाचे ऑडिट करून नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी उचाट गावातील ग्रामस्थ पालघर जिल्हापरिषदेच्या प्रशासणाकडे करत आहेत. या प्रसंगी उचाट गावातील आशिष मोरे, रवींद्र मोरे (पोलीस पाटिल) तसेच इतर ग्रामस्थ उपस्थितीत होते.
Join Our WhatsApp Community