पावसाळ्यात रेल्वे सेवा खंडित झाल्या, तर असतील ४०० बेस्ट आणि ११ एसटी बसेस सेवेत

148

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना केलेल्या निर्देशानुसार आता याची प्रत्यक्षात अमंलबजावणी केली जात असून पावसाळ्यात रेल्वे लोकल सेवा खंडित झाल्यास प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न आता महापालिकेकडून केला जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाशेजारी प्रवाशांना पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्ण्यासाठी बेस्टच्या माध्यमातून ४०० बसेस आणि एसटी महामंडळाच्या ११बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

( हेही वाचा : कोकणवासीयांसाठी मोठी बातमी! परशुराम घाटात अवजड वाहनांची वाहतूक ‘या’ वेळेत राहणार बंद)

४०० बेस्ट आणि ११ एसटी बसेस सेवेत

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्कालीन व्यवस्थापन विषयक एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. सदर बैठकीत पावसाळ्यादरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यास अशावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना योग्य ती मदत वेळच्यावेळी मिळावी, यादृष्टीने अधिक प्रभावी कार्यवाही करण्याच्या व त्यासाठी सुयोग्य नियोजन करण्याच्या सूचना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी केली होती. महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली होती. या सुचनेनुसार अधिक परिपूर्ण नियोजन करण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या स्तरावर करण्यात येत असल्याची माहिती बैठकीच्या सुरुवातीला महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिली.

लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास अशाप्रसंगी प्रवाशांना आपल्या नजिकच्या परिसरात पोहोचता यावे, यासाठी एसटी व बेस्ट बसेसची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश देतानाच या अनुषंगाने ‘सुनिश्चित कार्यपद्धती’ (SOPs) बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. संभाव्य प्रसंगी नागरिकांच्या सुविधेसाठी ४०० जादा बसेस वेगवेगळ्या ठिकाणांहून सोडण्याची बेस्टची तयारी, तर ११ जादा बसेस सोडण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन असल्याची माहिती यावेळी दिली.

आवश्यक मदत देण्यासाठी नियोजन

महानगरपालिकेच्या २४ विभागांच्या स्तरावर आणि इतर संबंधित संस्थांच्या स्तरावर समन्वय अधिकारी नेमण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी यापूर्वी दिले होते. त्यानुसारी समन्वय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे देण्यात आली. लोकल ट्रेन बंद असण्याच्या परिस्थितीत प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्राथमिक वैद्यकीय उपचार व इतर आवश्यक मदत देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास अशावेळी प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासह आवश्यक ती मदत योग्यप्रकारे मिळावी, यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभागांनी त्यांच्या स्तरावर रंगीत तालीम (मॉक ड्रील) आयोजित करण्याचे निर्देशही महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.