अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे पुनर्वसन सप्टेंबर अखेरपर्यंत तात्पुरत्या निवासांत

172

अति धोकादायक इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था मुंबई महानगरपालिकेच्या तात्पुरत्या निवा-यांमध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी दिले आहे. एकंदरीत आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि नागरी सेवा-सुविधांबाबत अधिकाधिक परिपूर्ण व अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्राचे संबंधित खासदार व आमदार यांच्याशी नियमितपणे संपर्क साधण्याचे निर्देशही चहल यांनी दिले आहेत.

( हेही वाचा : पावसाळ्यात रेल्वे सेवा खंडित झाल्या, तर असतील ४०० बेस्ट आणि ११ एसटी बसेस सेवेत)

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्कालीन व्यवस्थापन विषयक एका विशेष आढावा बैठकीचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. बैठकीला महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार हे मान्यवर विशेषत्वाने उपस्थित होते. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर, संबंधित खाते प्रमुख यांच्यासह बेस्ट उपक्रम, मध्य व पश्चिम रेल्वे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) इत्यादी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते.

अति धोकादायक इमारतींमध्ये (सी वन बिल्डींग) राहणा-या रहिवाशांच्या जीविताची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश तसेच त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी होते, याची माहिती महानगरपालिका आयुक्तांनी या बैठकीदरम्यान दिली. मुंबईतील धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असणा-या रहिवाशांनी इमारत रिकामी करावी, यासाठी महानगरपालिकेद्वारे सातत्याने विनंती व आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर संबंधित नियमांनुसार आवश्यकती कार्यवाही व कारवाईही नियमितपणे करण्यात येत आहे.

अति धोकादायक इमारतींमध्ये राहणा-या रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था मुंबईमहानगरपालिकेच्या तात्पुरत्या निवा-यांमध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत करण्याचे निर्देश दिले आहेत. एकंदरीत आपत्कालीन व्यवस्थापनाच्या दृष्टीने आणि नागरी सेवा-सुविधांबाबत अधिकाधिक परिपूर्ण व अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून सर्व २४ विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या विभागातील खासदार आणि आमदार यांच्याशी नियमितपणे संपर्क साधण्याचेही निर्देश दिले.

कोल्डमिक्स नसेल तर चालेल, काहीही वापरा पण खड्डे बुजवा

पावसाळ्यादरम्यान खड्डे भरताना प्राधान्याने ‘कोल्डमिक्स’ साहित्य वापरले जाते. परंतु पावसाळ्यादरम्यान पाऊस नसण्याच्या दिवशी अन्य प्रकारचे साहित्य निर्धारित पद्धतीनुसार उपयोगात आणण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहे. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणा-या मुंबईतील क्षेत्रातील रस्त्यांवर पावसाळ्यादरम्यान खड्डे पडण्याची शक्यता असते. या खड्ड्यांबाबत विविध माध्यमातून व हेल्पलाईनच्याही माध्यमातून माहिती व तक्रारी मुंबई महानगरपालिका प्रशासनास प्राप्त होत असतात.

प्राप्त झालेल्या खड्डे विषयक तक्रारींवर २४ तासांच्या आत खड्डे भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच कोणत्याही परिस्थितीत हा कालावधी ४८ तासांपेक्षा अधिक असू नये, यासाठी काटेकोरपणे खबरदारी घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची नियमितपणे पाहणी करण्याचे व पाहणी दरम्यान आढळून आलेल्या खड्ड्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.