यवतमाळ जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे वणी तालुक्यात नदी, नाल्यांना पूर आला आहे. निरगुडा नदीच्या काठी वसलेल्या नविन आणि जुन्या सावंगी गावाचा बॅक वॉटरमुळे संपर्क तुटला आहे. नवीन सावंगी येथून आजारी असलेल्या ९ लोकांना शोध व बचाव पथकाने पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे. यामध्ये एका गर्भवती ( 9 महिने 8 दिवस ) महिलेचा समावेश आहे.
वणी तालुक्यातील जुगाद, साखरा, सावंगी, घोन्ता, कवडसी, दहेगाव, चिंचोली या गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. निरगुडा नदी वर्धा नदीला मिळते. मात्र वर्धा नदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात बॅकवॉटरचा वेढा गावांना बसत आहे. सावंगी या गावालासुद्धा एक ते दीड किलोमीटर बॅकवॉटरचा वेढा बसलेला आहे. नवीन सावंगी आणि जुन्या सावंगी यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅक बटर असल्यामुळे दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. नवीन सावंगीमध्ये सुमारे 1 हजार लोकवस्ती असून, शोध व बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. येथील ९ लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. यामध्ये एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेसोबत ३ मुलांचा तसेच मूत्रपिंड आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. बाहेर काढलेल्या व्यक्तींमध्ये रामचंद्र गोपाळ वाघमारे, शांता रामचंद्र वाघमारे , बंडू रामचंद्र वाघमारे, विजू खिरटकर, वेदांत विजू खिरटकर, मनीष विजू खिरटकर, प्रदीप आसुटकर, निराक्रश प्रदीप आसुटकर, तसेच गर्भवती महिलेचा समावेश आहे.
( हेही वाचा: “देशात २९ नाही ७५ राज्यांची गरज”, सुरुवात विदर्भापासून करा; महाराष्ट्रातील माजी आमदाराचे पंतप्रधानांना पत्र )
जिल्हाधिका-यांचे आवाहन
या कुटुंबीयांना सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शोध व बचाव पथकातिल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन चमू परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत तसेच जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. पुराच्या पाण्यात किंवा पुलावरून पाणी वाहत असताना, कोणीही पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.