सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला ओळखले जाते. स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI आपल्या ग्राहकांच्या हिताचा विचार करून नेहमीच त्यांना सतर्क करत असते. मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी आहे. ती म्हणजे आता SBI कडून कर्ज घेणे महाग होणार असून नवीन आणि जुन्या ग्राहकांचा EMI देखील वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, एसबीआयने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) वाढवण्याची घोषणाही केली आहे. हे नवीन दर 15 जुलैपासून लागू होतील. याआधी जूनमध्येही SBI ने MCLR वाढवला होता.
बघा वाढलले नवे दर
स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, बँकेने एका वर्षाच्या कालावधीसाठी MCLR सध्याच्या 7.40 टक्क्यांवरून 7.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 7.35 टक्क्यांवरून 7.45 टक्क्यांपर्यंत वाढवला जाणार आहे तर दोन वर्षांच्या कालावधीसाठी MCLR 7.60 टक्क्यांवरून 7.70 टक्क्यांपर्यंत आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी ते 7.7 टक्क्यांवरून 7.8 टक्के केले जाणार आहे. दरम्यान, किरकोळ कर्जदारांवर MCLR चे दर वाढल्याने घर, कार आणि वैयक्तिक कर्जासाठी किरकोळ कर्जे जास्त असू शकतात आणि यामुळे मासिक हप्त्यांवर (EMIs) देखील परिणाम होणार आहे.
(हेही वाचा – Gmail वापरताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा, अन्यथा तुमचे Account होऊ शकते बॅन)
SBI ने दिला मोठा धक्का
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर साधारण सर्व सरकारी आणि खासगी सरकारी बँकांनी गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. यापूर्वी आरबीआयने मे महिन्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती, त्यानंतर जूनमध्ये रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. सध्या रेपो दर 4.90 टक्के इतके आहे.