बेस्ट उपक्रमाकडून सध्या इलेक्ट्रिक बस चालवल्या जात आहेत. या बसेसचे तिकीट दरही कमी असल्याने प्रवाशांकडून या बेस्टला प्राधान्य दिले जात आहे. प्रवाशांना अधिक चांगली सुविधा देण्यासाठी जुन्या बसेसच्या बदल्यात नव्या एसी आणि पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बसेस बेस्टकडून सध्या चालवल्या जात असून येत्या काही महिन्यांमध्ये २१०० बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत परंतु इलेक्ट्रिक बसचे कंत्राट रखडल्याने आता पुढील सहा महिने बेस्टच्या ताफ्यात नव्या बसेस उपलब्ध होणार नाही अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे परीक्षण
१४०० इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अपात्र ठरविण्याच्या बेस्टच्या निर्णयाला टाटा मोटर्सने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. टाटा मोटर्सला अपात्र ठरवण्याचा बेस्टचा निर्णय योग्य असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले मात्र, त्याचवेळी या निविदा प्रक्रियेत एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीची निविदा योग्य ठरवण्याचा बेस्टाचा निर्णयही चुकीचा आहे असा निर्णय देत पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याची सूचना न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि माधव जामदार यांच्या खंडपीठाने केली होती. आता इलेक्ट्रिक बसेसच्या निविदेबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे परीक्षण सर्वोच्च न्यायालयात करण्यात येणार आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे परीक्षण केले जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी स्पष्ट केले.
( हेही वाचा : ‘पहिली बस’ केव्हा व कुठे धावली? वाचा आपल्या ‘बेस्ट’चा रंजक प्रवास)
बेस्ट उपक्रमाकडे एकूण ३६२७ बसेस आहेत. त्यामध्ये १८५४ बसेस या बेस्टच्या मालकीच्या आहेत. तर, १७९३ बसेस या भाडे तत्वावर ताफ्यात आहेत. सध्याच्या बसेसच्या उपलब्धततेनुसार अवघ्या ५० अशोक लेलॅण्ड कंपनीच्या बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील. तर, सध्याच्या बेस्टच्या ताफ्यातील १८५४ बसेसपैकी ३०० बसेस स्क्रॅपसाठी जातील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भाडेतत्वावरील बसेसमध्ये ३४० बसेस या टाटा मोटर्सने पुरवलेल्या आहेत. तर ४० बसेसचा पुरवठा हा इतर कंपन्यांकडून करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community