राज-फडणवीस भेट: ‘मातोश्री’चे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न?

155
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी, गेल्या काही दिवसांत दोघांमध्ये वाढलेली जवळीक ‘मातोश्री’चे महत्व कमी करण्यासाठी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्यात सत्तांतर नाट्य सुरू असताना या घडामोडींत राज ठाकरे कुठेही दिसले नाहीत. पायावर शस्त्रक्रिया झाल्याने ते काही दिवस राजकारणापासून लांब होते. देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मात्र त्यांनी पत्र लिहीत फडणवीसांचे अभिनंदन केले. पक्षनिष्ठा काय असते हे फडणवीसांनी दाखवून दिले, असे म्हणत राज ठाकरेंनी त्यांचे कौतुकही केले. फडणवीसांनीदेखील विधानसभेतील भाषणात राज ठाकरेंच्या पत्राचा उल्लेख केला. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

….म्हणून तब्बल दीड तास घेतली ठाकरेंची भेट

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर, कट्टर हिंदुत्व आणि मराठी अस्मिता हे मुद्दे शिवसेनेच्या अजेंड्यावरून काहीसे बाजूला झाले. राज ठाकरे यांना बळ दिल्यास, हे दोन्ही मुद्दे शिवसेनेकडून ‘हायजॅक’ करता येतील. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे महापालिकेत आजही मनसेचा ‘आवाज’ कायम आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची साथ मातोश्रीचे महत्त्व कमी करण्यासोबतच शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांना सुरंग लावण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, अशी खात्री भाजपला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी तब्बल दीड तास राज यांच्या भेटीकरीता राखून ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोन दिवसांपूर्वीच राज-फडणवीस भेट होणार होती. मात्र, मुंबईतील मुसळधार पाऊस आणि फडणवीसांचा पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी झालेला दौरा यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. शुक्रवारी ११.३० वाजता फडणवीस राज यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केली. शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे औक्षण करून, नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा दिल्या. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यावेळी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.