भायखळ्यात शिवसैनिकांच्या गाडीवर हल्ला, उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला इशारा

138
गुरुवारी, १४ जुलै रोजी भायखळा येथे शिवसैनिकांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला झाला. त्यानंतर शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भायखळा येथे येऊन शिवसेनेच्या शाखा क्रमांक १०८ ला भेट देऊन हल्ला झालेल्या शिवसैनिकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तिथे उपस्थित पोलिसांना ‘शिवसैनिकांना संरक्षण द्या, जमत नसेल तर हात वर करा, मग शिवसैनिक त्यांच्या पद्धतीने संरक्षण करतील’, असा इशारा दिला.

उपमुख्यमंत्र्यांना विचारून कारवाई करा 

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांवर कशा पद्धतीने हल्ला झाला याची हकीकत ऐकल्यावर उद्धव ठाकरे तिथे उपस्थित पोलिसांना म्हणाले की, राजकारणात असे कधी घडले नव्हते, शिवसैनिकांवर हल्ला कधीही खपवून घेणार नाही. या हल्ल्याप्रकरणी ज्यांच्यावर संशय आहे, त्यांची ताबडतोब जबानी नोंदवून घ्या. तसेच सध्या सगळा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहत आहेत, तेव्हा पोलिसांनी त्यांना जाऊन यावर तातडीने काय कारवाई करायची हे विचारून घ्यावे, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये 

पोलिसांनी ताबडतोब या शिवसैनिकांना संरक्षण द्यावे, जर पोलिसांना संरक्षण देणे जमत नसेल, तर त्यांनी तसे सांगावे, हात वर करावे, शिवसैनिक स्वतः त्यांचे संरक्षण करतील, शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागता काम नये, पोलिसांनी राजकारणात पडू नये. शिवसैनिकाच्या जीवाशी खेळणार असाल तर गप्प बसणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.