महापालिका शाळा : शालेय वस्तूंऐवजी पैसे वाटपात गोंधळात गोंधळ

139

मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्यास विलंब होत असल्याने आता प्राथमिक स्थितीत इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गांमधील छत्री वाटपाऐवजी पैसे वाटपाचा निर्णय घेण्यात आला. या छत्रीच्या खरेदीकरता विद्यार्थ्यांना प्रत्येकी २७० रुपये मुख्याध्यापकांमार्फत वितरीत करण्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या पैशांचे वाटप शुक्रवारपासून करण्यात येत आहे. त्यामुळे एकाबाजूला प्रशासन छत्रीचे पैसे दिल्याचे आणि शिक्षकांकडून छत्रींच्या खरेदीची बिले जमा करण्यात येत असल्याचा दावा करत असली तरी प्रत्यक्षात मुलांना पैसेच मिळाले नाही तर छत्री कधी खरेदी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : रविवारी बाहेर निघताय? मध्य आणि हार्बर मार्गावर या वेळेत असणार मेगाब्लॉक )

मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येत असून दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशीच या शालेय वस्तूंचा पुरवठा केला जातो. परंतु या वस्तूंच्या खरेदीला झालेल्या विलंबामुळे महापालिका शिक्षण विभागाने प्रायोगिक तत्वावर छत्री ऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेतला. यासाठी २७० रुपये मुख्याध्यापकांच्या खात्यांमध्ये जमा करून त्यांच्या मार्फत ही रक्कम छत्री खरेदीसाठी मुलांना उपलब्ध करून दिला जाईल,असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. मागील आठ दिवसांपासून शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांना पैसे उपलब्ध करून दिले जातील आणि ही रक्कम मुलांना देऊन त्यातून छत्रीची खरेदी केली जाईल,असे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. छत्रीच्या खरेदीचे पैसे मुलांना देण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला होता.

वस्तूंऐवजी पैसे वाटप चुकीचे

परंतु महापालिका शाळांमधील मुख्याध्यापकांच्या खात्यांमध्ये गुरुवारी व शुक्रवारी पैसे जमा झाले. त्यामुळे प्रत्यक्षात शनिवारी या पैशांचे वाटप केले जाणार आहे. महापालिका शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार, सर्व प्रथम छत्रीचे पैसे देण्याबाबतच्या सूचना आल्यानंतर पालक व मुलांची संयुक्त सभा घेऊन त्यांना याची सूचना दिली. त्यामध्ये त्यांनी तयारी दर्शवली. प्रत्येक शाळांच्या मुख्यध्यापकांचे स्वतंत्र खाते तयार करून त्यात हे पैसे जमा करण्यात आले आहे. ते पैसे बँकेतून काढून शनिवारी मुलांना छत्री खरेदीसाठी दिले जातील. या छत्रीच्या खरेदीकरता जीएसटीची बिल आवश्यक असल्याने ज्या दुकानांमध्ये जीएसटीची बिले दिले जातील तेथून छत्री खरेदी करण्याच्याही सूचना दिल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. मात्र, छत्रीच्या खरेदीकरता पैसे वाटप हे मर्यादीत मुलांपुरतेच आहे. परंतु दप्तर,पाण्याची बॉटल्स किंवा अन्य वस्तूंऐवजी पैसे वाटप करणे हे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना करणे कठीण जाणार आहे. शाळांमधील मुलांचा प्रवेश, मुलांना शिकवणे हे सर्व सोडून हे अतिरिक्त कारकुनी काम आता शिक्षक आणि मुख्याध्यापकांना करावे लागणार आहे.

याबाबत बोलतांना माजी शिक्षण समिती सदस्या शितल म्हात्रे यांनी, शालेय वस्तूंचे वाटपच करण्याचा निर्णय यापूर्वी का घेण्यात आला होता, याचा उद्देश प्रशासनाने लक्षात घ्यायला हवा. डिबीटी करण्यास आमचा विरोध नाही. परंतु त्याआधी प्रत्येक शाळांमध्ये तसे नियोजन करावे हवे. पण कोणतेही नियोजन नसताना आयत्या वेळी वस्तूंऐवजी पैसे वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यायला लावणे हे चुकीचे आहे. छत्री वाटपात तो गोंधळ दिसून येत आहे. उद्या इतर वस्तूंऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेतल्यास मुलांना ना धड वस्तू मिळणार ना पैसे. उलट शिक्षक व मुख्याध्यापकांना मनस्तापच अधिक होईल. शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना शिकवण्याचे काम करू द्या, त्यांना कारकुनाचे काम देऊ नका असे म्हात्रे यांनी म्हटले आहे.

भाजपचे माजी महापलिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही महापालिका शिक्षण विभागाच्या नियोजन शुन्य कारभाराचा हा नमुना असल्याची टीका केली आहे. मुख्याध्यापकांना जर अजून पैसेच वाटप झाले नाही तर मुलांना याचे वाटप झाले हे कशाच्या आधारावरून बोलले जात आहे असा सवाल करत शिंदे यांनी छत्री वाटपातील गोंधळ पाहता भविष्यात दप्तर व पाण्याची बाटली डबा तसेच इतर साहित्य खरेदीकरता देण्यात येणाऱ्या पैशांच्या वाटपात गोंधळच होणार आहे. यात शिक्षक भरडला जाणार आहे. मग त्यांनी मुलांना शिकवायचे की मुलांकडून वस्तूंच्या खरेदीची बिले गोळा करत बसायची असा सवाल त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.