शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्यानंतर शिवसेनेने आता नव्या सरकारला विधिमंडळात घेरण्याची तयारी सुरू केली आहे. आमदार संख्या कमी असल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला सोडावे लागले असले, तरी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून पत्र पाठविण्यात आले आहे.
राष्ट्रवादीनेही या पदावर दावा केला
विधान परिषदेत शिवसेनेचे १२, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० आमदार आहेत. त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ अधिक असल्याने विरोधी पक्षनेतेपद मिळावे, असे शिवसेनेने पत्रात म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीनेही या पदावर दावा केला आहे. विधान परिषदेत सरकारविरोधात आवाज उठवण्यासाठी अनुभवी नेत्याची गरज आहे. आमच्याकडे एकनाथ खडसेंसारखे सरकारला धारेवर धरू शकणारे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही आम्हालाच मिळावे, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. परिणामी येत्या काळात विधान परिषदेच्या पक्षनेते पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच पहायला मिळणार आहे.
(हेही वाचा प्रवेश घेताय तर जाणून घ्या, कोणत्या महाविद्यालय, विद्यापीठाचा किती आहे रँकिंग?)
मुंबईकर चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता
शिवसेनेत या पदासाठी जोरदार लॉबिंगही सुरू झाले आहे. माजी मंत्री अनिल परब आणि सचिन अहिर यांची नावे या स्पर्धेत आघाडीवर आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर चेहऱ्याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेचा ग्रामीण चेहरा अशी ओळख असलेले अंबादास दानवे, हेही इच्छुक आहेत. नामांतराचा मुद्दा हाती घेऊन औरंगाबादेत शिवसेना पुन्हा बळकट करायची झाल्यास दानवे यांना मोठी संधी देण्याची गरज आहे. यानिमित्ताने ती पूर्ण करता येऊ शकेल.
विधान परिषदेतील संख्याबळ
- भाजप – २४
- शिवसेना – १२
- राष्ट्रवादी – १०
- कॉंग्रेस – १०