कोळी बांधवांना विश्वासात घेऊनच कोस्टल रोडचा विकास

131

महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाबाबत(कोस्टल रोड) मच्छिमारांचे म्हणणे स्थानिक आमदार तथा पर्यावरण मंत्र्यांकडून तसेच मुख्यमंत्र्यांकडून कधीही ऐकून घेण्यात आले नाही. त्यामुळे आता कोस्टल रोड प्रकल्पाचा विकास करताना स्थानिक मच्छिमारांच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत त्या बैठक आयोजित करून जाणून घेतल्या जाणार आहे. मच्छिमारांना सेफ केल्याशिवाय कोस्टल रोडचा विकास होणार नाही असा विश्वास भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा : पुणे-पानशेत मार्गावर कोसळली दरड, रस्त्यावर दगडांचा खच; ३० गावांचा संपर्क तुटला)

मच्छिमारांवर अन्याय होऊ देणार नाही

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी औपचारिक चर्चा करताना कोस्टल रोड प्रकल्पाचे काम हे स्थानिक मच्छिमारांच्या मागण्या विचारात घेऊनच केले जाणार असल्याचे सांगितले. कोस्टल रोडसंदर्भात स्थानिक मच्छिमारांच्या मागण्या स्थानिक आमदार असलेले आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऐकून घेतल्या नाही. स्थानिक आमदारांचे वडिल मुख्यमंत्री असूनही मच्छिमारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आल्या नाही. परंतु आता राज्यातील सरकार बदलले आहे. मच्छिमारांच्या समस्या वरळीला जावून मी ऐकून आलो आहे, समुद्रात फिरून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. भाजप आमदार ऍड आशिष शेलार यांनाही कोळीबांधवांच्या समस्या माहित आहे. कोळी बांधवांचा मुद्द माहित असल्याने भाजप आता हा मुद्दा सरकारच्या मदतीने सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या मच्छिमारीचा धंदा बंद होता कामा नये. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. कुणाच्या पोटावर लाथ मारला जावू नये या भूमिकेचे आपण असून त्यांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून दिली जाणार असल्याचे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यानंतर हा प्रश्न सुटणार असाही विश्वास व्यक्त करत यापूर्वी समन्वय नसल्याने मच्छिमारांचे ऐकूण घेतले जात नव्हते, परंतु आता त्यांचे ऐकूनच प्रकल्प पूर्ण केला जाईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत स्थानिक मच्छिमारांवर अन्याय होऊ देणार नाही. मच्छिमारांना सेफ करूनच या प्रकल्पाचे काम केले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.