उद्धव ठाकरे हे भावनिक मुद्द्यावरच निवडणूक लढवू शकतात – नितेश राणे

172

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूक उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना हे भावनिक मुद्द्यावरच लढवू शकतात. जनतेला भावनिक मुद्यावरून ब्लॅकमेल करण्याऐवजी विकासाच्या मुद्यावर बोलण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे भाजपा विरोधात मराठी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु असून भाजपा कधीही मुंबई आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणसांविरोधात नाही. परंतु चुकीचे घेतलेले निर्णय रद्द करण्यात येत असल्याने आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे झाकून टाकण्यासाठी उद्धव ठाकरे हे भावनिक मुद्द्याशिवाय काहीच करू शकणार नसल्याचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

भाजपामधील कुणीही मराठी विरोधात नाही

मुंबई महापालिकेत भाजपाचीच सत्ता येणार असून मुंबई शहराला दर्जेदार शहर बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. विद्यमान सरकारच्यावतीने विविध विकासाची कामे हाती घेत त्यांना गती देण्याचे काम केले जाईल. यामध्ये मुंबई मेट्रो रेल आणि कोस्टल रोडचा प्रमुख समावेश असेल, असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले. मराठीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना भावनिक राजकारण करायला निघाली आहे. शिवसेना भावनिक मुद्यावरच निवडणूक लढवते. भाविनक मुद्यावर कशी निवडणूक लढवायची हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला माहीत आहे. भाजपामधील कुणीही मराठी विरोधात नाही आणि मुंबई तोडण्याचा कुणी प्रयत्न करत नाही. पण उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते हे मुद्दाम हळूहळू असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा त्यांचे प्रस्ताव रद्द होऊ लागले आणि त्यांचे भ्रष्टाचार समोर येवू लागले, तेव्हा बाळासाहेबांचे नाव पुढे केल्याशिवाय ते काहीच करू शकत  नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा सत्तांतरानंतर अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याचा अल्बम ‘तेरे बिन अब तो सनम…’)

भाजपा मुंबई व महाराष्ट्रावर प्रेम करणारा

बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घरांची किंमत २५ लाख रुपये केली. पण सरकार जाणार असल्याने ही रक्कम १० लाखांवर आणली, पण आम्हाला हे मोफत द्यायचे आहे. सरकार जाणार म्हणून आणि आदित्यचा मतदार संघ ढिला होईल म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला, पण आम्ही ही घरे मोफत देऊन मराठी माणूस इथेच राहिल यांचा विचार करू. कोस्टल रोड प्रकल्पामध्ये मूळ भूमिपुत्रांना विस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आम्ही त्यांचा मागण्या ऐकून घेत त्यांना विस्थापित होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे सर्व विषय मराठी माणसांशी निगडीत आहे. जेवढा आम्ही मराठी बहुल विभागात फिरायला लागलो तेव्हा मराठी लोकांना कसे फसवले गेले हे आता जनताच सांगू लागली आहे. बाळासाहेबांचा काळ वेगळा होता आता ते  कॉर्पोरेट झाले आहे, बीडीडीच्या इमारती ४० मजली  बांधल्या जाणार आहेत. पण पुढे त्यांची काय अवस्था होईल याचा विचार त्यांनी केलाय काय?  बेस्टचाही  तोच विषय. सर्व मराठी माणशांची निगडीत हे विषय आहेत, पण देवेंद्र  फडणवीस सोमय्या गार्डनवर जे बोललेच नाही, ते वाक्य त्यांच्या मुखात टाकून भाजपाला बदनाम केले जात आहे. भाजपा हा पक्ष मुंबई व महाराष्ट्रावर प्रेम करणारा आहे. मुंबईला दर्जेदार शहर बनवण्याची स्वप्न आम्ही पाहतो, मग ताडण्याची भाषा, मराठी माणसांवर अन्यायाची भाषा जाणीवपूर्वक वापरली जाते. शेवटी त्यांच्या हाती काहीच मुद्दे नाही, अशा शब्दांत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा समाचार घेतला.

मुंबईच्या विकासकामांना गती देणार

बेस्टमध्ये मराठी माणूसच आहे, मराठी माणूस टिकला पाहिजे, याचे कोणतेही नियोजन नाही. बेस्ट आगाराच्या जागा खासगी विकासकाला दिल्या जात आहेत. बस कंडक्टर ही संकल्पना बंद होत आहे.  किती मराठी  लोकांच्या पोटावर पाय येतो, याचा कधी विचारच केला गेला नाही. २९ हजार महापालिका सफाई कामगार आहेत. पण त्यांना बाब मोफत घरे का दिली जात नाही. ते सर्व मराठीच आहेत ना. मग ठाकरेंच्या सरकारने ती योजना का बंद केली, असाही सवाल नितेश राणे यांनी केला. मुंबई विकासकामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे गती देणार असल्याचे सांगितले. आगामी निवडणुकीला सामोरे जाताना भाजपा हा आमच्या हाती काहीच नाही, असे मानूनच काम करणार आहे. आम्ही कोणत्याही अतिआत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जाणार नसून भाजपाचे कमळ म्हणजे बाळसाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारा पक्ष असा विश्वास जनतेमध्ये निर्माण करून निवडणूक लढवली जाईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.