मुंबईत मागील काही दिवसांपासून मलेरिया आणि डेंग्यूच्या आजाराचे रुग्ण वाढू लागले असून या आजाराचा प्रसार करणाऱ्या डासांच्या अळ्या चक्क रेल्वे स्थानकाच्या शेडवरील पन्हाळीत निर्माण होऊ लागल्या आहेत. दादर, माहिम, माटुंगा व शीव रेल्वे स्थानकाच्या शेडवरील पन्हाळीत साचलेल्या पाण्याच्या तपासणीत एकूण २१ ठिकाणी मलेरिया आजार पसरविणाऱ्या अॅनोफिलीस डास अळ्याची उत्पत्ती आढळून आली आहे. त्यामुळे कधी काळी बांधकामांची ठिकाणे या आजाराची उत्पत्तीची ठिकाण बनली होती, परंतु आता रेल्वे स्थानकावर बसवलेले सफेद आणि निळ्या रंगाच्या पत्र्यांची छते आता डासांचे अड्डे बनताना दिसत आहेत.
डासांच्या अळ्यांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्याची मोहीम
सद्या मुंबईत काही दिवसापासून पावसाचा जोर वाढला असून त्या बरोबरच साथीचे आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे “मलेरिया, डेंगी साथीचे आजार नियंत्रणासाठी संपूर्ण मुंबईत विशेष डास आळी निर्मूलन मोहीम” राबवण्यात येत आहे. मुख्यत्वे मलेरिया, डेंगी आजारांच्या नियंत्रणासाठी पालिकेच्या जी/ उत्तर विभागातील कीटक नियंत्रण खात्यामार्फत विशेष डास अळी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, टेरेसवर टाकलेले अडगळीचे सामान, झोपडपट्टीमधील पाण्याचे ड्रम, प्लास्टीक ताडपत्रीमध्ये पावसाचे साचलेले पाणी, भंगार वस्तु, बांधकामे इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान डास आळया आढळून आल्यास ती उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात येतात किंवा योग्य त्या कीटकनाशकाची फवारणी करण्यात येत आहे.
(हेही वाचा – ‘या’ वेळेस चुकूनही पिऊ नका Green Tea, फायद्याऐवजी होईल तोटा!)
या स्थानकाच्या शेडवर आढळल्या मलेरिया डासांच्या अळ्या
पालिकेच्या जी / उत्तर विभागांतर्गत दादर, माहिम, माटुंगा व धारावी परिसरात मलेरिया, डेंगी नियंत्रणासाठी विविध उपक्रम राबविले जात असून रेल्वे स्थानकाच्या छतावरील पन्हाळींमध्ये साचलेल्या पाण्यावर कीटकनाशकाची फवारणी करण्यात येत आहे. या मोहिमेत दादर, माहिम, माटुंगा व शीव या रेल्वे स्थानकाच्या शेडवरील पन्हाळीत साचलेल्या पाण्याच्या तपासणीत एकूण २१ ठिकाणी मलेरिया आजार पसरविणार्या अॅनोफिलीस डास अळ्याची उत्पत्ती आढळून आली आहे. जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय किटक नाशक अधिकारी आणि त्यांची टीम ही यशस्वी मोहीम राबवत आहेत. प्रमुख किटक नाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी बनवून दिलेल्या एसओपी नुसार ही मोहिमेत राबवली जात आहे. त्यामुळे आपल्या घरात, कार्यालयात आणि परिसरात पाणी साचू शकतील अशी ठिकाणे तात्काळ नष्ट करून पाणी साचणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.
Join Our WhatsApp Community