राज्यभरात पावसाने कहर केल्यानंतर अनेक गावांचा संपर्क तुटला असून ठिकठिकाणी नदी, नाले तुटुंब भरून वाहत आहेत. कोकणात मुसळधार पाऊस असून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात आठवड्यात दुसऱ्यांदा दरड कोसळल्याचे समोर आले आहे. दरड कोसळल्याने या घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली असून पुण्याच्या दिशेने येणार वाहतूक ठप्प झाली आहे.
(हेही वाचा – ‘या’ वेळेस चुकूनही पिऊ नका Green Tea, फायद्याऐवजी होईल तोटा!)
घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा
मिळालेल्या माहितीनुसार, सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही दरड कोसळली. यामुळे रत्नागिरीवरून राजापूर-कोल्हापूर मार्गाने पुण्याला जाणारी एसटी बसही अडकली असून जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प ढाली असून वाहतूक पूर्णतःविस्कळीत झाली आहे. तर घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
पावसामुळे अनुस्कुरा घाट प्रवासासाठी धोकादायक
दरम्यान, कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या प्रमुख घाटांपैकी एक असलेला घाट म्हणजे अनुस्कुरा. या घाटात गेल्या काही दिवसात अनेकदा दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यात. त्यानंतर बऱ्याचदा घाटातील काही भागात एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आलेली होती. परंतु मुसळधार पावसामुळे अनुस्कुरा घाट सध्या प्रवासासाठी अधिक धोकादायक बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस झाला असून या मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. तर हा धोका लक्षात घेता वाहन चालकांनी खबरदारी बाळगून आणि सतर्क राहत या मार्गावरून गाड्या सावकाश चालवण्याचे आवाहन केले आहे.