राज्यभरात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्विटनंतर या चर्चांना अधिक उधाण आले.यावरच शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत स्पष्टीकरण दिले. मात्र यावर दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया देत पलटवार केला आहे.
राऊतांवर दिपाली सय्यद यांचा पलटवार
संजय राऊत हे नेहमी वादग्रस्त, बिनधास्त विधाने करत असल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच दिपाली सय्यद यांनीही राऊतांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या, राऊत त्यांचे काम करत आहेत. ते भाजपालाही त्याच पद्धतीने बोलायचे आणि ती त्यांची शैली आहे. ते बिनधास्त बोलत असतात. पण त्यामागे त्यांचा हेतू फक्त शिवसेनेला पाठिंबा देणं हाच असतो. पण राऊतांनी शांतता घ्यावी आणि त्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्रिक आणावं, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येत्या दोन दिवसात भेट होणार असल्याचा दावा सय्यद यांनी केला.
(हेही वाचा – ठाकरे- शिंदे एकत्र येणार? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…)
दिपाली सय्यद पुढे असेही म्हणाल्या की, मला जे वाटतं ते मी मांडते. प्रत्येकाच्या मनात इगो मान-अपमान आहे. पण दूर व्हावा, अशी माझी इच्छा आहे. तुटलेलं घऱ एकत्र यावं हे कार्यकर्ती म्हणून मला वाटतं. संजय राऊत हे मोठे आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु, राऊतांनी शांततेचा पवित्रा घ्यावा आणि मध्यस्थी घडवून आणावी. कारण, मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, असं स्पष्ट मत सय्यद यांनी व्यक्त केलंय.
काय म्हणाले होते राऊत…
दिपाली सय्यद यांच्या ट्विटसंदर्भात राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले, याची मला माहिती नाही. ते काही प्रवक्ते नाही. अशा प्रकारची वक्तव्य करताना काळजीपूर्वक करणं आवश्यक आहे. ते दोघं एकत्र येतील किंवा नाही ते येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी आहेत मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही एकत्र काम केले तर त्यांनी एकत्र यावं असं का वाटणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
चर्चेत असलेलं दिपाली सय्यद यांचं ट्विट
येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल.
https://twitter.com/deepalisayed/status/1548358677635076116?s=20&t=zsAXZ5-AiijTyuDzkDmzFQ
Join Our WhatsApp Community