ठाणे खाडीतील फ्लेमिंगो पक्ष्यांना गुजरातच्या भावनगरचा परिसर खुणावत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. महिन्याभरात हुमायून, सलीम या लेसर प्रजातीच्या दोन फ्लेमिंगो पक्ष्यापाठोपाठ मॅकेन नावाचा तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला ग्रेटर प्रजातीच्या फ्लेमिंगो पक्ष्याने एका रात्रीत गुजरात राज्यातील भावनगरजवळील घोघा परिसरात प्रवेश केला. सलग तीन फ्लेमिंगो पक्षी मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानंतर खाडी परिसर सोडून गुजरातमधील पाणथळ जमीन गाठत असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञानी मांडला. ठाणे खाडी ते गुजरातचा भावनगर परिसरातील अंदाजे 300 ते 400 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तिन्ही पक्ष्यांनी रात्री प्रवासाला सुरुवात केली.
फ्लेमिंगो पक्ष्यांच्या प्रवास मार्गाची उत्सुकता
‘हुमायून’चा प्रवास
हुमायून पक्ष्याने सर्वात पहिल्यांदा ठाणे खाडी सोडली. हुमायूनच्या प्रवासात आणि सलीम, मॅकेनच्या प्रवासात फरक आहे. सलीम आणि मॅकेनच्या प्रवासात जवळपास साम्य आहे. दोघांनीही कुठेही ब्रेक न घेता थेट गुजरातचा भावनगर परिसर गाठला. हुमायूनने दोन दिवसाच्या प्रवासात दोन ठिकाणी विश्रांती घेतली. गुजरातच्या वापी आणि सुरतच्या समुद्रकिनाऱ्याजवळ तो काही काळासाठी थांबला होता. ठाणे खाडी सोडल्यानंतरही पालघरपर्यंत तो समुद्रकिनाऱ्यामार्गेच पुढे जात होता. 28 जून रोजी ठाणे खाडी सोडल्यानंतर 30 जून रोजी हुमायूनने भावनगर गाठले.
‘सलीम’चा प्रवास
तिन्ही फ्लेमिंगो पक्ष्याच्या प्रवासमार्गाचा अभ्यास हा शास्त्रज्ञाची उत्सुकता वाढवणारा आहे. 6 जुलै रोजी सलीम नावाच्या फ्लेमिंगो पक्ष्याने ठाणे खाडी सोडून एका रात्रीत थेट समुद्रमार्गे दुसऱ्या दिवशी 7 जुलैला भावनगरचा परिसर गाठला होता. पालघर जिल्ह्यातील तलासरी भागातून त्याने नजीकच्या गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याजवळील वलसाडच्या समुद्रकिनाऱ्याला जवळून जात थेट अरबी समुद्रातमार्गे एका रात्रीत भावनगर गाठले.
‘मॅकेन’चा प्रवास
या घटनेला आठवडा होत नाही तोच गुरुवारी 14 जुलै रोजी मॅकेन नावाच्या फ्लेमिंगो पक्ष्याने ठाणे झाडी सोडली. मॅकेनने सलीम आणि ठाणे खाडी सोडलेल्या पहिल्या सॅटलाईट टॅगिंग केलेल्या ‘हुमायून’ नावाच्या पक्ष्याप्रमाणेच राज्यातील पालघर जिल्ह्यापर्यंत भौगोलिक प्रदेशातून प्रवास केला. त्यापुढे गुजरात राज्याचा समुद्र किनारा न गाठता थेट अरबी समुद्रातून 15 जुलैच्या सकाळी भावनगर जिल्ह्यात घोघा येथे प्रवेश केला.
Join Our WhatsApp Community