वाताच्या रुग्णांसाठी यंदाचा पावसाळा पुन्हा डोकेदुखी ठरला आहे. पावसाळ्यात वातावरणातील थंडावा वाढल्याने वाताच्या रुग्णांच्या शरीरातील स्नायू, पाठ आणि सांध्यांची दुखणी पुन्हा वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. दररोज घरगुती उपाय केले तरीही शरीरात वाढलेला वात नियंत्रणात येऊ शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
सकाळचा आहार
सकाळी रिकाम्या पोटी वाताच्या रुग्णांनी कोमट पाण्यासह एक चिमूटभर ओव्याचे सेवन करावे. जेणेकरुन शरीरात गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी राहील. तसेच शरीरात उष्णताही अबाधित राहील.
तेलाचा मसाज
शरीरात वाढलेली थंडी कमी करण्यासाठी दर दिवसाला रात्री झोपण्यापूर्वी वाताच्या रुग्णांनी शरीरभर तेलाचा मसाज करावा. शरीराला अॅलर्जी नसणारे कोणतेही तेल शरीराला लावता येईल. राईचे तेल किंवा तीळाचे तेल उष्ण असल्याने वाताच्या रुग्णांसाठी या तेलांच्या वापराचा सल्ला डॉक्टर देतात. तेलाच्या मसाजाने स्नायूंना बळ मिळते. शरीरातील वातही शमण्यास मदत होते.
फास्ट फूडवर नियंत्रण
शरीरात वात असलेल्या रुग्णांनी मैद्यापासून बनलेले, तळलेले पदार्थ तसेच ब्रेड, पिझ्झा, बर्गर हे पदार्थ खाणे टाळावे. आमवात आणि संधीवात या दोन्ही रुग्णांना आंबलेले तसेच आंबट पदार्थ खाता येत नाही.
कोमट पाण्याचे सेवन
वाताच्या रुग्णांनी थंड पदार्थांच्या सेवनापासून लांब राहावे, तसेच दिवसभर जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळ कोमट पाण्याचे सेवन करावे.
हीट ब्लॅंकेटचा वापर करावा
शरीराला वातावरणातील गारवा किंवा घरातील एसी सहन होत नसल्याने वाताच्या रुग्णांनी पायात मोजे घालावेत. आजकाल ऑनलाईन बाजारात हीट ब्लॅंकेट उपलब्ध आहेत. या ब्लॅंकेटवर झोपल्यास स्नायूंना तसेच ब्लॅंकेटचा स्पर्श झालेल्या भागांना ऊब मिळते. ब्लॅंकेट वायरने प्लगशी कनेक्ट असते. शरीराला झेपेल इतके तापमान ब्लॅंकेटला लावलेल्या बटणासह नियंत्रणात ठेवता येते. ऑनलाईन बाजारात हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत ही हीट ब्लॅंकेट उपलब्ध आहेत.
Join Our WhatsApp Community