एकत्र सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस-शिवसेनेत आता विरोधी पक्षनेते पदावरुन खडाजंगी

133

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील मतभेद प्रकर्षाने समोर येत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेमुळे विरोधी बाकांवर बसायची वेळ आलेल्या महाविकास आघाडीत आता विरोधी पक्षनेते पदावरुनच बिघाडी झाल्याचे पहायला मिळत आहे.

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसची वर्णी लागल्यानंतर आता. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे. वरच्या सभागृहात आमच्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता व्हावा, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. शिवसेनेने सुद्धा या पदावर दावा सांगितल्यामुळे विरोधी पक्षनेते पदावरुन काँग्रेस आणि शिवसेनेतच चढाओढ होणार असल्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंना बसणार धक्का?

विधान परिषदेत काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता व्हावा अशी आमची मागणी आहे. त्यासाठी माझ्यासह काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे शिवसेना आणि राष्ट्रवादीशी चर्चा करत असल्याचे विधान नाना पटोले यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का बसण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेसाठी विरोधी पक्षनेते पद महत्वाचे

शिंदे गटाच्या बंडाळीमुळे एकीकडे पक्ष वाचवण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली आहे. त्यामुळे विधान परिषदेत जर आपला विरोधी पक्षनेता बसला तर सरकारवर वचक राहून आपले अस्तित्व देखील टिकेल, अशी शिवसेनेला आशआ आहे. त्यामुळे शिवसेनेने या पदासाठी विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गो-हे यांना पत्र लिहिले होते. त्यामुळे काँग्रेसने देखील या पदासाठी आता हालचाली सुरू केल्या आहेत.

राष्ट्रवादीची भूमिका ठरणार निर्णायक

विरोधी पक्षनेते पदासाठी रंगलेल्या या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे असलेल्या काँग्रेसच्या मागणीला जर राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवला तर काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळू शकते. त्यामुळे या पदासाठी आता राष्ट्रवादी काय भूमिका घेणार आणि त्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना त्यांची कशी मनधरणी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.