सध्या भारताच्या दक्षिणेकडील शेजारी देश, श्रीलंकेमध्ये काय उत्पात चालू आहेत ते आपण बघतच आहोत. प्रक्षुब्ध नागरिक, ज्यात प्रामुख्याने गोरगरीब आणि वंचित अशा प्रजेचा समावेश आहे. आपल्या जीवनातील आर्थिक अडचणीमुळे ते इतके संतापले आहेत की त्यांना रोखण्याची शक्ती राज्याच्या पोलीस दलांकडे नाही. पोलिसांनी त्यांच्यावर अश्रूधूर, लाठ्या, पाण्याचे प्रचंड फवारे, आधी शस्त्रांचा मारा केला. पण ही खवळलेली प्रजा त्या कशालाही न जुमानता राष्ट्राध्यक्षांच्या आलिशान प्रासादात घुसली आणि तिथे त्यांनी अक्षरशः तांडव केले. हा प्रक्षोभ पाहून त्यांचे राष्ट्राध्यक्ष गोताबाया राजपक्षे हे देश सोडून आधी मालदीव व त्यानंतर सिंगापूर येथे परागंदा झाले. हे सर्व कशामुळे घडले?
ही आहेत प्रमुख कारणे
त्याची प्रमुख कारणे अशी, पहिले म्हणजे सत्तेतील मुरून बसलेली घराणेशाही, श्रीलंकेत गेली अनेक वर्षे राजपक्षे घराण्याची सत्ता आहे. इसवी सन २०१० ते २०१५ साली तर ह्या घराण्याचे एकूण ४० सदस्य विविध सरकारी पदांवर कार्यरत होते! दुसरे कारण म्हणजे ह्या प्रकारच्या राज्यकर्त्यांचे कमालीचा हावरटपणा आणि त्यातून चाललेला भ्रष्ट कारभार. तिसरे म्हणजे प्रजेला अनुनय करून सर्व गोष्टी फुकट देण्याची चढाओढ, ज्यात देशाचा खजिना झपाट्याने रिकामा होत असतो पण त्याकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष असते, कारण ह्या राज्यकर्त्यांची टोकाची अर्थ निरक्षरता! ह्या तिन्ही कारणांमुळेच त्यांनी कारण नसताना, सवलतीत मिळाले म्हणून चीनकडून भरमसाट कर्ज घेतले आणि ते अनुत्पादक कार्यात खर्च केले.
भ्रष्टाचारामुळे सामान्यांमध्ये असंतोष
त्या पैशातून ‘हंबनटोटा’ येथे एक अत्याधुनिक बंदर बांधले आता त्याचा उपयोग चीन देश स्वतःच्या संरक्षण व्यूहरचनेसाठी पुरेपूर करून घेत आहे. कर्जफेडीसाठी हे बंदर एक करारान्वये ९९ वर्षांसाठी चीनला वापरायला देणे भाग पडले. तरीही ह्या देशावरचा कर्ज भार अजून प्रचंड आहे आणि देशाची परकीय चलनाची गंगाजळी आता पूर्णपणे रिती झाली आहे! त्याही परिस्थितीत राजपक्षे कुटुंबाने स्वतःची राजेशाही राहणी सोडली नाही आणि भ्रष्टाचाराद्वारे प्रचंड पैसे परदेशात साठवून ठेवल्याचे दिसत आहे. सामान्य प्रजेचा असंतोष वाढल्यामुळेच आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था डोळे मिटायच्या मार्गावर
जवळजवळ अशीच परिस्थिती आता आपला दूसरा शेजारी पाकिस्तान आणि थोड्या फार प्रमाणात बांगलादेश इथेही येऊ घातली आहे. पाकिस्तानात सुद्धा शाहबाज शरीफ, बिलावल भुट्टो आणि इम्रान खान ह्या नमुनेदार घराणेशाही राज्यकर्त्यांनी भरपूर भ्रष्टाचार केला आणि देशाच्या संपत्तीची अमाप लूट केली. जमेल तितके आपल्या प्रजेला फुकट सवलती देण्याची आश्वासने देत राहिले. पण देशाचे उत्पन्न वाढविण्याचा अजिबात विचार केला नाही. सदैव ऋण काढून सण साजरा करण्याची वृत्ती! आता कर्जदारांनी पाठ फिरवली आहे तेव्हा पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचे डोळे फिरले आणि तेही इतके की आता ती अर्थव्यवस्था डोळे मिटायची तेवढीच बाकी राहिली आहे!
ह्या देशात अभूतपूर्व २१ टक्के महागाई वाढली आहे आणि प्रजा आता बंड करण्याच्या तयारीत आहे. श्रीलंकेसारखीच अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण व्हायला आता फार वेळ लागणार नाही! त्यात तिथल्या बलूचिस्थान आणि खैबर-पखतूनख्वा प्रांत फुटून निघण्याच्या तयारीत आहेत. त्याही देशात चीनकडून घेतलेल्या कर्जाने हाहाकार मांडला आहेच!
बांग्लादेशवरही संकट ओढावण्याची शक्यता
बांगलादेशाची अर्थव्यवस्था वरील दोन्ही देशांच्या मनाने जरा बरी आहे, परंतु तेथे सत्ताधाऱ्यांच्या सगे सोयऱ्यांच्या वशिलेबाजीने टोक गाठले आहे. राष्ट्र प्रमुख शेख हसीना ह्यांना आपल्या जवळच्या लोकांना भ्रष्टाचारापासून रोखता येत नाही असे दिसत आहे. त्यामुळे प्रजेत असंतोष वाढत आहे. निर्यात मंदावली आहे पण खर्चावर सरकारचे नियंत्रण नसल्याने परकीय कर्ज भरमसाट वाढत आहे. त्यात कोविड काळात मार खाल्लेली अर्थव्यवस्था अजून उभारी घेत नाहीय. ह्या सर्व परिस्थितीवर लवकरच नियंत्रण आणले नाही, तर तिथे देखील श्रीलंकेच्याच पद्धतीने अराजक येऊ शकते!
ह्या सर्व उदाहरणातून भारताला काही धडे शिकणे आवश्यक आहे. सुदैवाने भारतीय नेतृत्व पंतप्रधान मोदी हे स्वच्छ, खंबीर व अर्थसाक्षर असे असल्याने आपली अर्थव्यवस्था आता पूर्वीपेक्षाही जास्त सुदृढ झाली आहे.
Join Our WhatsApp Community