नुकताच भारतात गुरु पौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा झाला. व्यास मुनींनी महाभारतासारखा उत्तुंग इतिहास आणि अद्भुत काव्य रचून भारतावरच नव्हे तर सबंध जगावर उपकार केलेले आहेत. व्यास मुनींमुळेच भगवान श्रीकृष्णाची भगवद्गीता घराघरात पोहोचली. भगवद्गीतेचा आदर्श घेऊन अनेक वीर महात्मे या भारतभूमीत घडले आहेत. आधुनिक भारतात ही भूमिका स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निभावलेली आहे.
सावरकरांनी हिंदुत्व हा मंत्र प्रत्येक हिंदूला देऊन त्याला त्याच्या अस्तिवाची जाणीव करुन दिली. हिंदू विसरला होता की आपण हिंदू आहोत. त्याने भंपक हिंदी राष्ट्रवाद स्वीकारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शिकवण आपल्या कृतीतून दिली, ती शिकवण आपण विसरुन गेलो.
व्यास मुनी आणि श्रीकृष्णाची भूमिका
तेव्हा एका व्यास मुनीची आणि श्रीकृष्णाचीही गरज होती. केवळ ग्रंथ निर्मिती करुन चालणार नव्हतं, तर ग्रंथ निर्मितीसह कृती देखील करायची होती. त्यावेळेस भगुरमधला एक १५ वर्षांचा मुलगा पुढे आला आणि त्याने अष्टभुजा देवीसमोर बसून प्रतिज्ञा घेतली, ‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन.’ वीर सावरकरांनी आपली प्रतिज्ञा खरी करुन दाखवली. सावरकरांनी लेखणी हातात घेऊन व्यासांची भूमिका पार पाडलीच. पण सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करुन व थेट त्या क्रांतीत उतरुन आणि पुढे लोकशाही मार्गाने इंग्रजांचा प्रतिकार करुन श्रीकृष्णाची भूमिका सुद्धा त्यांनी पार पाडली आहे.
स्वातंत्र्याच्या अधिकारासाठी लढा
एकाच वेळी लेखणी आणि तलवार चालवणारा असा अद्भूत पुरुष या जगात दुसरा नाही. सावरकरांचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी खूप लिहिलं, त्याच बरोबर त्यांनी खूप केलं सुद्धा. त्यांनी हिंदूंना भंपक हिंदी राष्ट्रवादाच्या कल्पनेतून बाहेर काढलं आणि हिंदूंना आपल्या मूळ स्थितीत आणून ठेवलं. त्यांना जाणीव करुन दिली की स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या झाडावरचं फळ नाही, जे दगड मारल्याने पडेल आणि आपल्या हाती येईल. स्वातंत्र्य ही एक दिव्य संकल्पना आहे आणि तो आपला नैसर्गिक अधिकार आहे. तो अधिकार मिळवण्यासाठी आपल्याला लढा उभा करावा लागेल.
हिंदुंचे गुरू
दुसरी गोष्ट त्यांनी हिंदूंना हिंदू म्हणून जगायला शिकवलं. नेक्स्ट इयर इन जेरुसलेम म्हणत ज्यूंनी हजारो वर्षे वाट पाहिली आणि आज त्यांचा इस्रायल नावाचा देश अस्तित्वात आलेला आहे आणि तो खंबीरपणे उभा आहे. ही जाणीव सावरकरांनी हिंदूंना करुन दिली. वीर सावरकर जर जन्माला आले नसते तर भारताची शंभर शकले उडाली असती. सावरकरांनी हिंदू समाजाला भरभरुन दिलेलं आहे. त्यांनी आपल्या झोळीत काहीही ठेवलं नाही. त्यामुळे सावरकर हे खऱ्या अर्थाने हिंदू समाजाचे गुरु आहेत.
मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे,
इतकं दिलंत, इतकं दिलंत
इतकं दिलंत तुम्ही मला!
खरं सांगतो,
माणूस केलंत तुम्ही मला
त्यांच्याच शैलीत सावरकरांबद्दल बोलायचं तर,
इतकं दिलंत, इतकं दिलंत
इतकं दिलंत तुम्ही आम्हाला!
खरं सांगतो,
हिंदू केलंत तुम्ही आम्हाला…
आणि हो!
या जगात जोपर्यंत हिंदू शाबूत आहे. तोपर्यंत हे जग आनंदवनभूवन आहे.