मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला गट स्थापन केल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षासंदर्भातील अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. सोमवारी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करुन नवीन कार्यकारिणी जाहीर केली. याचसंदर्भात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. शिंदे गटाला शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे शिंदेंनी या कार्यकारिणीला कोणताही अधिकार नसल्याचे म्हणत हा कॉमेडी एक्सप्रेस सिझन 2 असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिंदे गटाला अधिकार नाही
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केल्यानंतर उर्वरित शिवसेना खासदारांची संजय राऊत यांच्या घरी बैठक पार पडली. त्यावेळी राऊत यांनी शिंदेंवर टीका केली आहे. हा प्रकार कॉमेडी एक्सप्रेस सिझन 2 आहे. सिझन 1 हा विधीमंडळात झालेला आहे. ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली आहे, ती कायद्याच्या नियमाच्या आधारावर पक्की असून न्यायालयात आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.
शिवसेना आजही भक्कम
त्यामुळेच या भयातूनच शिंदे गटाने घाईघाईने कार्यकारिणी जाहीर केली आहे. एक फुटीरतावादी गट शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करु शकत नाही. त्या गटाला अजूनही अधिकृत पक्षाची मान्यता नाही. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आणि आमदारांना वाचवण्यासाठी ही कार्यकारिणी जाहीर करण्याचा हा प्रकार आहे. पण शिवसेना जे सोडून गेले आहेत त्यांच्याशिवाय भक्कम आहे आणि ती अधिक भक्कम होईल, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
ही बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना आहे. ही खरी शिवसेना असून त्याला अधिकृत मान्यता आहे. त्यामुळे या शिवसेनेबाबत कोणताही निर्णय घेण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. राऊतांच्या घरी झालेल्या बैठकीत शिवसेनेचे लोकसभा खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, संजय बंडू जाधव उपस्थित होते. ओम राजे निंबाळकर व कलाबेन डेलकर हे खासदार वाटेत होते. तर शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या.
Join Our WhatsApp Community