अमरावती जिल्ह्यातील वाढत्या कॉलराच्या साथीनंतर आरोग्य विभागाने १५ जुलै रोजी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच राज्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे अद्याप पूरसदृश्य परिस्थिती कायम असल्याने पावसाळी आजार नियंत्रणात राखण्यासाठी आवश्यक सूचनाही आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत.
( हेही वाचा : ‘गेट वे ऑफ इंडिया’वर कार्यक्रमांसाठी मोजावे लागणार इतके पैसे )
कॉलरा तसेच इतर जलजन्य आजारांची संभाव्यता लक्षात घेता गावपातळीवर पाण्याच्या शुद्धीकरणाबाबत लक्ष देण्याच्या सूचना वैद्यकीय पथकाला दिल्या आहेत. वैद्यकीय पथकाने प्रत्येक पेय जल स्त्रोतांच्या पाण्याचे नमुने नियमितपणे प्रयोगशाळेत पाठवणे बंधनकारक आहे. अशुद्ध पाण्याच्या नमुन्यामागील कारणेही शोधण्याच्या सूचना वैद्यकीय पथकाला देण्यात आल्या आहेत.
कॉलराची साथ पसरल्यास
० पाणी उकळून गार करून प्या किंवा मेडिक्लोअरचा वापर केलेल्या पाण्याचे सेवन करा.
० स्वयंपाक करण्यापूर्वी जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.
० ताज्या अन्नाचे सेवन करा, शिळे अन्न खाणे टाळा.
० शौचालयास गेल्यानंतर तसेच लहान मुलाची शी धुतल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्या.
० शौचासाठी स्वच्छतागृहाचा वापर करा. पाण्याच्या स्त्रोताजवळ शौचाला बसू नका.
० घरातील कोणालाही उलट्या झाल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.
० बाळाला जुलाब होत असतील तरीही सहा महिन्यांखालील बाळाला अंगावरील दूध पाजणे बंद करु नका.
० रुग्णाला दवाखान्यात नेईपर्यंत आर.आर.एस. योग्य प्रमाणात देत रहा.
० साथ संपूर्ण नियंत्रणात येईपर्यंत उकळलेले कोमट पाणी प्या.
Join Our WhatsApp Community