अमरावतीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. दरम्यान चांदूर बाजार तालुक्यातील फुबगाव येथील घर जमीनदोस्त झाले. या घरात ५ व्यक्ती वास्तव्यास होत्या. घरातील पाचही व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आले आहे. परंतु, आई आणि मुलीचा मृत्यू झाला असून, ३ व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे हलवण्यात आले आहे.
तर साईनगर भागात सोमवारी दुपारी अडीच वाजता सच्चिदानंद तिवारी, ५५ यांच्या मालकीच्या मातीच्या घराची मागची भिंत कोसळली. भिंत कोसळली त्यावेळी घरात एकाच कुटुंबातील पाच जण होते. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. तत्काळ अग्निशमन अधीक्षक अन्वर यांनी घटनास्थळी भेट देऊन निरीक्षण केले. तसेच संभाव्य धोका बघता तिवारी यांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला.
( हेही वाचा: मंत्रालयात आता पाण्याची बाटली घेऊन जाता नेता येणार नाही; नव्या सरकारने घातली बंदी )
इतर ठिकाणीही पाणी शिरल्याने नुकसान
यासोबतच कठोरा नाका येथील शाल बार, पीडीएमसी वसतिगृहाकडून कांता नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, नालसाबपुरा मनपा शाळेजवळ, रेल्वे स्टेशन रोडवरील श्री गजानन व श्री साईबाबा मंदिराजवळ आणि रुक्मिणी नगर येथे रस्त्यावर झाड कोसळले. अग्निशमन विभागाने तत्काळ कारवाई करत झाडे बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. त्याचप्रमाणे साबणपुरा बस स्थानकाजवळील मार्केटमध्ये पाणी शिरले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या बाजूला असलेल्या मार्केटमधील तळमजल्यावरील दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले.
Join Our WhatsApp Community