इतिहासात प्रथमच डाॅलरच्या तुलनेत रुपयाची 80 रुपये प्रति डाॅलरची घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी रुपया प्रति डाॅलर 80 रुपयांच्या खाली गेल्याने, व्यापा-यांना प्रचंड नैराश्य आले आहे. रुपया यावर्षी 7 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार करताना दिसत आहे. मागच्या अनेक दिवसांपासून याची चिन्हे दिसत होती, असं व्यापा-यांचे म्हणणे आहे.
रुपयाच्या घसणीचे कारण काय?
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्र्यांनी लोकसभेत माहिती दिली की, 2014 आणि 2022 दरम्यान, डाॅलरच्या तुलनेत रुपया 25 टक्क्यांपेक्षा जास्त कमजोर झाला आहे. तज्ज्ञांच्या मते विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारातून पैसे काढून घेणे हे रुपयाच्या घसरणीचे सर्वात मोठे कारण आहे. याशिवाय कच्च्या तेलावर होणारा जास्त खर्चही यासाठी कारणीभूत आहे.
( हेही वाचा: अमरावतीत पावसामुळे घर जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू तर ३ जण गंभीर )
तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार?
भारतात अनेक वस्तू या परदेशातून आयात केल्या जातात. यात पेट्रोलियम पदार्थांसह खाद्यतेल आणि इलेक्ट्राॅनिक वस्तू यांचा समावेश आहे. रुपयाची घसरण अशीच सुरु राहिली, तर आयात वस्तूंवर आपल्याला जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहे. म्हणजे आयात वस्तूंवर खर्च वाढल्यास देशात विक्रीसाठीदेखील त्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. रिफाइंड ऑईल, मोबाईल आणि लॅपटाॅपपर्यंत अनेक वस्तू महाग होऊ शकतात.