मागील महिनाभरात एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातील शिवसेनेत उभी फूट पाडली. आता महापालिकांपासून ग्रामपंचायतीपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडत आहे. शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि पदाधिकारी राजीनामे देऊन शिंदे गटात सहभागी होत आहेत. त्यातच शिवसेनेतील १८ पैकी १२ खासदार मंगळवारी, १९ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून देण्याच्या तयारीत आहेत, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवसेनेत उभी फूट
सध्या शिवसेनेची सुरु असलेली पडझड आता दिल्लीच्या पातळीवरही सुरु झाली आहे. संसदेचे अधिवेशन सुरु होताच, मुख्यमंत्री शिंदे हे दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. सोमवारी, १८ जुलै रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत शिवसेनेचे १२ खासदार उपस्थित होते, मात्र त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा फेटाळून लावला. मात्र तरीही त्यावेळी त्यांच्या सोबत अवघे ५ खासदारच उपस्थितीत होते. त्यामुळे दिल्लीच्या पातळीवर शिवसेनेत उभी फूट पडणार हे निश्चित झाले असतांना आता उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीही अस्वस्थ झाले आहेत. तेही शिंदे गटाच्या मार्गावर जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा शिवसेनेच्या बारा खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट)
मातोश्रीतील निकटवर्ती उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
यात खुद्द उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. नार्वेकर यांनी भाजपच्या एका नेत्याच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी अद्याप त्यावर निर्णय घेतला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सरचिटणीस आणि श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे समजते आहे. याव्यतिरिक्त शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हेदेखील एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु त्यांना प्रतिसाद मिळेल, याची शक्यता कमीच आहे. त्याचबरोबर अनिल परबांनीही शिंदे गटाची कास धरण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांनाही शिंदे गटात सामील करून घेण्यास शिंदे गटातील नेतेमंडळी अनुकूल असतील, अशी शक्यता नाही. परंतू उद्धव ठाकरे यांचे किचन कॅबिनेट म्हणून ओळख असलेले हे नेतेही सध्याची राजकीय स्थिती पाहता उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत.
Join Our WhatsApp Community