जाज्वल्य देशभक्ती कशी असावी, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यपूर्वकाळात ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी हालअपेष्टा सोसल्या, त्यात सावकर प्रमुख होते. ही वस्तूस्थिती संपूर्ण भारतविश्वाला माहीत आहे. त्यामुळे केवळ विरोधाला विरोध म्हणून स्वातंत्र्यवीरांवर टीका केली जात असेल, तर आम्ही ते सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते तथा ज्येष्ठ नेते आमदार दीपक केसरकर यांनी दिला.
( हेही वाचा : खासदार राहुल शेवाळे यांची बदनामी करण्याचे षडयंत्र – कामिनी शेवाळेंचा खुलासा )
‘अंतिम जन’ या नियतकालिकात स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याविषयी १२ लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यातील संपादकीय लेखात, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जेवढे महात्मा गांधींचे योगदान आहे, तेवढेच सावरकर यांचेही आहे, असे म्हटले आहे. त्यावर काही पक्ष आणि व्यक्तींनी निरर्थक वाद सुरू केला आहे. याविषयी बोलताना केसरकर म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचे जितके योगदान महत्त्वाचे आहे, तितकेच वीर सावरकरांचेही आहे. स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाला आपल्या विचारधारेबरोबर जाण्याची मुभा होती. त्यांची विचारधारा जर हिंदुत्त्वाची असेल, तर ती मुभा त्यांना भारताच्या घटनेने दिली आहे. त्यामुळे सावरकरांवर जी टीका केली जात आहे, त्याने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक दुखावला जात आहे.
स्वातंत्र्याची ज्योत लोकमान्य टिळकांनी लावली. त्यामुळे लोकमान्य टिळकांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. तेवढाच अभिमान स्वातंत्र्यवीर सावकरांचाही आहे. त्यांनी स्वातंत्र्यासाठी ज्या हालअपेष्टा सोसल्या, त्या दुसऱ्या कुणी सोसून दाखवाव्यात. अंदमानमध्ये त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार झाले. पण, त्यांनी देशभक्तीशी तडजोड केली नाही. त्यामुळे त्यांच्या देशप्रेमाला लोकांनी सलाम केला पाहिजे. केवळ विरोधाला विरोध म्हणून सावकरांवर कोणी टीका करू नये. आम्ही ती सहन करणार नाही. महाराष्ट्राची जनता बोलत नसली, तरी लोकांना हे मनातून आवडलेले नाही. याचा परिणाम काँग्रेसला येत्या निवडणुकीत पहायला मिळेल, असेही केसरकर म्हणाले.
खरा इतिहास लोकांसमोर येतोय – उपाध्ये
काँग्रेस काय किंवा तुषार गांधी काय, यांनी देशहिताच्या विचारला दाबण्याचा किंवा अनुउल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कायम राष्ट्रहिताची भूमिका मांडली, हे संपूर्ण देश जाणतो. त्यांनी केलेला त्याग आणि संघर्ष प्रचंड मोठा आहे. केवळ गांधी आडनावामुळे तुषार गांधी यांना अशा तऱ्हेने बोलण्याचा अधिकार नाही. राष्ट्रहिताचा विचार प्रभावीपणे मांडणाऱ्या अनेकांना काँग्रेसने अनुउल्लेखाने मारले, हा इतिहास आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेकांनी आपले सर्वस्व गमावले. त्यात वीर सावरकर आघाडीवर होते. पण काँग्रेस आणि तद्दन विचारांच्या लोकांनी काही ठराविक लोकांचा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अशाप्रकारे लपवाछपवी करून इतिहास झाकता येत नाही. खरा इतिहास आता लोकांसमोर येतोय, असे मत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली.
Join Our WhatsApp Community