माजी मंत्री रामदास कदम आता एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. परंतु, या गटाचा मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्ये नारायण राणे मोठ्या हुद्द्यावर आहेत. एकेकाळी रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या आदेशानुसार राणेंना शिंगावर घेतले होते. आता त्यांच्यासोबत कसे जुळवून घेणार, असे विचारले असता कदम म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या समवेत उद्धव ठाकरे अडीच वर्षे सत्तेत बसले होते. मग नारायण राणे यांच्या शेजारी बसायला आम्हाला काय अडचण आहे? राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
( हेही वाचा : अडीच वर्षांनी वरळीकरांना लाभले आमदारांचे दर्शन)
मी स्वतःहून राजीनामा दिला असतानाही पक्षाने हकालपट्टीचे पत्र जारी केले. बहुधा गेल्या ५२ वर्षांच्या निष्ठेचे हेच फळ उद्धव ठाकरे यांनी दिले असावे. ‘हकालपट्टी’ शब्द ऐकून फार वाईट वाटले. रात्रभर झोपलो नाही. यापुढची भूमिका शिवसेना वाचवण्याची असेल. शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र कसे आणता येईल, पुन्हा भगव्या झेंड्याला तेज कसे आणता येईल, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. तीन वर्षे माध्यमांसमोर बोलण्यास उद्धव ठाकरे यांनी बंदी घातली होती. पण आता मी तोंड उघडण्यास सुरुवात केली आहे. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षविस्तारासाठी राज्यभर फिरणार, असेही कदम यांनी सांगितले.
पवारांमुळे शिवसेना फुटली
शिवसेना फुटली ती अजित आणि शरद पवार यांच्यामुळेच. दोघांनीही १०० आमदारांचे लक्ष्य ठरवले होते. पुढच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांना पाडायचे आणि स्वपक्षातील माजी आमदारांना निवडून आणायचे, ही त्यांची रणनीती होती. त्यासाठी निधीवाटपात दुजाभाव सुरू होता. आमच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना निधी मिळायचा, पण आम्हाला नाही, असे प्रकार गेल्या अडीज वर्षांपासून सुरू होते. हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला. पण त्यांनी लक्ष दिले नाही, असा आरोप कदम यांनी केला.
आदित्य ठाकरे हस्तक्षेप करायचे
२०१४ मध्ये सेना-भाजपची सत्ता असताना पर्यावरण मंत्रिपद रामदास कदम यांच्याकडे होते. आदित्य ठाकरे त्यात हस्तक्षेप करायचे का, असे विचारले असता कदम म्हणाले, मी मंत्री असताना ‘काका, अमूक अधिकाऱ्याला बोलवा, बैठक घ्या’, असे आदित्य सांगायचे. चर्चेतही सहभागी व्हायचे. त्यांना पर्यावरणात रस असल्यामुळे बोलत असतील, असा माझा समज होता. पण, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना पर्यावरण खाते दिले गेले, तेव्हा सारा प्रकार ध्यानात आला, असेही कदम यांनी सांगितले.
एकनाथ शिंदेंनी पक्ष वाचवला
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या ५१ आमदारांचे अभिनंदन. कारण त्यांनी पक्ष वाचवला. नाहीतर शरद पवार यांनी सगळेच गिळंकृत करून टाकले असते. आणखी अडीज वर्षे महाविकास आघाडीची सत्ता टिकली असती, तर शिवसेनेचे पाच-सात आमदारही निवडून आले नसते. एकनाथ शिंदे खमक्या माणूस आहे. त्यांच्यासोबत गेलेल्या ५१ पैकी एकाही आमदाराला ते पडू देणार नाहीत, याची खात्री आहे, असेही कदम यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community