शिवसेना आमदारांनंतर आता 12 खासदारही शिंदे गटात सामील झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिवसेना-भाजप युतीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठोस भूमिका न घेतल्यामुळे आपण शिवसेनेतून बाहेर पडल्याचे या खासदारांनी सांगितले आहे. मात्र आमदारांप्रमाणेच खासदारांनीही शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
बंड करणा-यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात येत आहे. त्याला आता शिवसेनेचे बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येऊ दाखवावं, असं आव्हान जाधव यांनी राऊतांना केलं आहे.
(हेही वाचाः ‘एक वर्षापूर्वी ठाकरे-मोदी भेटीत झाली होती युतीबाबत चर्चा’, राहुल शेवाळेंनी केले अनेक गौप्यस्फोट)
कुठल्याही प्रभागातून निवडून दाखवावं
आम्हाला शिवसेनेमुळे आम्हाला इतकं सगळं मिळालं असं जर राऊतांचं म्हणणं असेल, तर येत्या काळात आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. त्यामध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेचं धनुष्य बाण घेऊन कुठल्याही प्रभागातून निवडून येऊ दाखवावं, असं थेट आव्हान प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना दिलं आहे.
आम्हाला बोलायची संधी नाही
संजय राऊतांप्रमाणेच विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावरही खासदारांची नाराजी असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. लोकसभेत खासदारांना बोलण्यासाठी जो वेळ दिला जातो त्यामध्ये शिवसेनेला मिळालेल्या वेळेपैकी 70 टक्के वेळ अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांनीच घेतला आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या मतदारसंघातील विषयांवर बोलायला संधी मिळत नव्हती. त्यामुळेही आम्ही नाराज होतो.
(हेही वाचाः जे उद्धव ठाकरेंनी सांगितले तेच आम्ही केले, शिंदे गटातील 12 खासदारांचा खळबळजनक दावा)
उद्धव ठाकरेंभोवती चांडाळ चौकडी
मी माझ्या जिल्ह्यात शिवसेनेचा संस्थापक आहे. 1986 पासून शिवसेनेची शाखा स्थापन करत मी बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना वाढवण्याचे काम केले आहे. गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे यांच्या सभोवती असणा-या चांडाळ चौकडीमुळेच आम्ही शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या चांडाळ चौकडीने उद्धव ठाकरे यांना चुकीचे मार्गदर्शन करत त्यांना लोकांपासून लांब ठेवण्याचे काम केल्यामुळेच आज शिवसेनेवर ही वेळ आली आहे, असेही खासदार प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community